(रत्नागिरी)
तालुक्यातील नाणीज येथे एका वृद्धाचा मृतदेह घराजवळील नाल्याच्या पाईपमध्ये आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी उघडकीस आली. मृताचे नाव विजय तानू कांबळे (वय ६०, रा. नाणीज बौद्धवाडी, रत्नागिरी) असे आहे. ते घरी एकटेच राहत होते. अतिप्रमाणात दारूचे व्यसन असल्याने पत्नी विशाखा कांबळे आणि मुले मुंबईत राहतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.
२४ ऑक्टोबर रोजी पत्नीने फोन केला असता तो लागत नव्हता. नंतर फोन बंद असल्याने मुलीने गावातील दीपक गुरव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी घराला कुलूप असल्याचे सांगितले. त्यानंतर भाचा स्वप्निल साळवी यांनी गावात शोध घेतला, मात्र काहीच सुगावा लागला नाही. शेवटी विशाखा कांबळे स्वतः नाणीज येथे येऊन नातेवाईकांसह शोध घेत असताना विजय कांबळे यांचा मृतदेह रेवाळेवाडी–गुरववाडी मार्गावरील तिठ्याखालील नाल्याच्या पाईपमध्ये आढळला.
या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

