( रत्नागिरी /प्रतिनिधी )
देवरुखहून परतताना पांगरी येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण हातखंबा परिसर हादरला असताना, या पार्श्वभूमीवर बौद्धवाडीतील संयुक्त जयंती कार्यक्रम रद्द करण्यात आला. जयंतीनिमित्त जमा झालेली वर्गणी अपघातग्रस्त आणि मृत तरुणांच्या कुटुंबीयांना देण्याचा संवेदनशील निर्णय भारतीय बौद्ध महासभेच्या बोधिसत्व बौद्ध विकास मंडळ आणि संबोधी महिला मंडळांकडून घेण्यात आला आहे.
रविवारी (दि. २६ एप्रिल) झालेल्या या भीषण अपघातात सुमित विलास कांबळे आणि विकास काशीराम कांबळे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर विकास चंद्रकांत कांबळे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रत्नागिरीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तो अजूनही कोमामध्ये जीवनासाठी झुंज देत आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा (महाऊपासिका मीराताई आंबेडकर) गाव शाखेअंतर्गत बोधिसत्व बौद्ध विकास मंडळ आणि संबोधी महिला मंडळ, हातखंबा यांनी संयुक्त जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेऊन जयंतीसाठी जमा करण्यात आलेली रक्कम जखमी विकास कांबळे याच्या उपचारासाठी तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आधार म्हणून देण्यात आली आहे.
यावेळी बुद्ध पौर्णिमेनिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि विश्वाला शांतता, करुणा आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून संयुक्त जयंती साध्या पद्धतीने साजरी करत त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. बोधिसत्व बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष अनंत बाळू कांबळे, उपाध्यक्ष सुनील बाळू कांबळे, कोषाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्यासह प्रदीप कांबळे, विद्याधर कांबळे, सुयश कांबळे, महेंद्र कांबळे, नितीन कांबळे, प्रसन्नजित कांबळे तसेच महिला मंडळातील स्नेहल कांबळे, रसिका राजेंद्र कांबळे, आरती कांबळे, शालिनी महेंद्र कांबळे, सुजाता कांबळे आदी सदस्यांनी संबंधित कुटुंबीयांच्या घरी भेट देत त्यांचे सांत्वन केले आणि जमा रक्कम सुपूर्द केली. या निर्णयातून दुःखाच्या काळात समाजाने दाखवलेली एकजूट आणि माणुसकी अधोरेखित झाली असून, परिसरातून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.

मंडळाकडून मानवतेचे आवाहन
या दुर्दैवी अपघाताने तीनही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा कठीण प्रसंगी समाज म्हणून आपण सर्वांनी एकत्र येत तिघांच्याही कुटुंबियांना मदतीचा हात पुढे करावा, “दुःखात सहभागी होणे हीच खरी माणुसकी,” या भावनेतून प्रत्येकाने आपल्या परीने शक्य ती आर्थिक व नैतिक मदत करावी. छोटासा हातभारही या कुटुंबीयांसाठी मोठा आधार ठरू शकतो, मानवतेचा संदेश जपत संकटात सापडलेल्या या कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया, असे आवाहनही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

