(देवरुख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील बोरसूत ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आलेल्या रस्ता बांधकामावरून वाद अधिक तीव्र झाला आहे. सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या या कामात अनियमितता आणि नियमभंग झाल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ अँड. देवेन जोगदेव यांनी तक्रारदार शैलेश संसारे यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला नोटीस बजावली आहे. या घडामोडीमुळे जिल्हा परिषद, स्थानिक प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नोटिशीत नमूद केल्याप्रमाणे, जनतेच्या करातून उभारलेला निधी सर्वांगीण विकासासाठी वापरण्याऐवजी एका व्यक्तीच्या फायद्यासाठी खर्च केल्याचा आरोप आहे. संबंधित रस्ता सार्वजनिक गरज लक्षात न घेता एका विशिष्ट व्यक्तीच्या सोयीसाठी बांधण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हा रस्ता थेट विद्यमान सरपंचांच्या निवासस्थानापर्यंत नेण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले असून, शासकीय निधीचा वैयक्तिक वापर झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तांत्रिक बाबींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. शासकीय निकषांनुसार आवश्यक असलेले खडीकरण, डांबरीकरण आणि संरक्षक थर योग्य प्रकारे न केल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. प्रत्यक्ष पाहणीत खडीचा थर अपुरा असून डांबराचे प्रमाणही अत्यल्प असल्याचा दावा करण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे शासन व नागरिकांची फसवणूक झाल्याचेही नोटिशीत म्हटले आहे.
याशिवाय, गडगडी धरणातून पाणीपुरवठा करणारा कालवा बुजवून रस्ता तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही ठोस कारवाई न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित कामाची मोजणी, मंजुरी प्रक्रिया आणि ठेकेदाराला देयके देण्यास तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अभियंता समिती किंवा शासनमान्य प्रयोगशाळा नेमण्याचे सुचवण्यात आले आहे.
सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, संबंधित अभियंता आणि कंत्राटदार यांची भूमिका संशयास्पद असल्याचे नमूद करत, दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी सुरू न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या कागदपत्रांमध्ये फेरफार होत असल्याचा आरोपही समोर आल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

