(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी बुधवारी (दि. २१) जिल्ह्यात मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेवटच्या दिवशी एकूण ४६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी १५८ तर पंचायत समितीसाठी ३१० अर्जांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी असलेल्या ५६ गटांमधून एकूण २२९ अर्ज, तर पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी ४३४ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, राजापूर तालुक्याची आकडेवारी उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील ५६ गट आणि ११२ गणांची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, ५ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या दिवसांत अर्ज भरण्याचा वेग मंदावलेला असला, तरी अंतिम मुदत जवळ येताच इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी उडाली. मंगळवारप्रमाणेच बुधवारीही उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालयांत अर्ज भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. बुधवारी राजापूर वगळता उर्वरित आठ तालुक्यांमधून जिल्हा परिषद गटांसाठी २२९ आणि पंचायत समिती गणांसाठी ४३४ अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राजापूर तालुक्याची अंतिम आकडेवारी नंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पाली पंचायत समिती गणातून डॉ. पद्मजा संजय कांबळे या महायुतीच्या पहिल्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीला प्रारंभीच यश मिळाले आहे.
गुरुवारी (दि. २२) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सर्व तालुक्यांमध्ये अर्जांची छाननी होणार आहे. यात पात्र व अपात्र अर्जांची संख्या स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी असून, त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
प्रचारासाठी मिळणार मर्यादित कालावधी यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार आहे. २७ जानेवारी रोजी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २८ जानेवारीपासून अधिकृत प्रचारास सुरुवात होईल. मतदान ५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याने ३ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेपर्यंतच प्रचार करता येणार आहे. त्यामुळे अवघे सात दिवस प्रचारासाठी उपलब्ध राहणार असून, या मर्यादित कालावधीत उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

