( रायगड )
मुंबई–गोवा महामार्ग वर पळस्पे–कर्नाळा खिंड परिसरात रविवारी सकाळी सुमारे ११.३० वाजता टेम्पो ट्रॅव्हलर बस पलटी होऊन गंभीर अपघात झाला. साईकृपा हॉटेलसमोर झालेल्या या अपघातात बसमधील १० प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान यांच्या २४ तास उपलब्ध असलेल्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित नानासाहेब धर्माधिकारी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्याने जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णवाहिका चालक विश्वास पाटील यांनी तत्परतेने सेवा देत सर्व जखमींना सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवले. या जलद आणि निःस्वार्थ सेवेमुळे स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित संस्थेच्या विनामूल्य रुग्णवाहिका सेवेमार्फत आतापर्यंत ३२,८४० हून अधिक अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळाली असून अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. कर्नाळा खिंड परिसरात विठ्ठल कामत हॉटेलजवळ ही रुग्णवाहिका कायमस्वरूपी तैनात करण्यात आली आहे.
जखमींची माहिती:
या अपघातात कुमार रुद्र म्हात्रे (८), रवींद्र माने (३७), प्रियांका माने (३०), वीणा माने (५६), नागेश कुणाल (६०), रूपा कोलारे (४४), जीत माने (३४), सदाशिव सोमने (४२), सीता माने (५५) आणि स्नेहा माने हे जखमी झाले आहेत. सर्वांना हात, पाय, कंबर आणि डोक्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत.
दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.

