(मुंबई)
मुंबईतील विधान भवन येथे बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यामुळे आज पहाटे मोठी खळबळ उडाली. सकाळी ईमेलद्वारे विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विधान भवनातील कर्मचारी व उपस्थित नागरिकांना तत्काळ सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढले. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विधान भवनात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.
या धमकीनंतर पोलिसांनी संपूर्ण विधानसभा परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. सुरुवातीला सर्व कर्मचाऱ्यांना बाहेरच थांबवण्यात आले. त्यानंतर ओळखपत्रांची तपासणी करून आणि सुरक्षा पडताळणी पूर्ण केल्यानंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा विधान भवनात प्रवेश देण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणावर विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, आज सकाळी सीपीएच्या अधिकृत मेलवर बॉम्ब आणि मिसाईल हल्ल्याची धमकी देणारा मेल प्राप्त झाला. सध्या बॉम्ब शोधक पथक संपूर्ण परिसराची सखोल तपासणी करत आहे.
राम शिंदे यांच्या माहितीनुसार, या मेलमध्ये आणखी चार ठिकाणांना धमकी देण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय, शेअर बाजार, मेट्रो आणि बँक उडवून देण्याची धमकी देण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा मेल आज सकाळी ६.५७ वाजता प्राप्त झाला होता.
सुरक्षा यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. धमकीच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू असून अधिक माहिती चौकशी पूर्ण झाल्यानंतरच देण्यात येईल, असेही राम शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विधान भवन परिसरात मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या घटनेनंतर विधान भवन परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.
बॉम्ब शोधक पथकाने तपासणी पूर्ण केल्यानंतर अधिवेशनाचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हा धमकीचा ईमेल नेमका कुठून पाठवण्यात आला, याचा तांत्रिक तपासही पोलिसांकडून सुरू आहे. ही धमकी केवळ अफवा आहे की घातपाताचा प्रयत्न, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

