( कोल्हापूर )
कोल्हापूरमध्ये एका डॉक्टर महिलेवर घरात घुसून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शाहूपुरी येथील बिल्डर शक्ती विक्रम भोसले (वय ३५) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पतीला भेटण्याचा बहाणा करून महिलेच्या बंगल्यात प्रवेश केला. त्यानंतर स्वयंपाकघरात गेलेल्या महिलेच्या मागे जाऊन तिला जबरदस्तीने बेडरूममध्ये ओढत नेले आणि मारहाण करत अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने तिच्यासह तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर, या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करून संबंधित व्हिडिओ डिलीट करण्यासाठी एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर राजारामपुरी पोलीस ठाणे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

