( पुणे )
पुण्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवर आता समाजातील विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांनीही आपले मौन सोडत कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला असून मनोरंजनविश्वातील कलाकारांनीही दुःख व्यक्त केलं आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे, शरद पोंक्षे, अक्षय केळकर, कश्मिरा कुलकर्णी अशा अनेकांनी या प्रकरणाबद्दल दु:ख व्यक्त करत लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना रितेश देशमुख म्हणाले, “अशा दुर्दैवी घटना घडतात तेव्हा समाजाला मोठा धक्का बसतो. प्रत्येकाच्या मनात दुःख आणि संताप असतो. अशा वेळी जनतेचा आक्रोश व्यक्त होणे स्वाभाविक आहे.”
यावेळी त्यांनी सरकारकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली. “आता सरकारने स्वतःहून पुढे येऊन या नराधमांविरोधात तातडीने आणि प्रभावी कारवाई करावी. अशी रोखठोक कारवाई केली की त्याचा दरारा, दबदबा आणि भीती अशी कृती करणाऱ्यांमध्ये निर्माण होते. अशा प्रकरणांमध्ये फास्ट-ट्रॅक न्याय मिळणे अत्यंत गरजेचे आहे, ” असे ते म्हणाले.
रितेश यांना पुढे अशा व्यक्तींचा चौरंग केला पाहिजे का असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “त्या काळात निर्णय तसे घेतले जात होते, पण तो काळ वेगळा होता. हा काळ वेगळा आहे हेसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आपले नियम वेगळे आहेत, आपलं संविधान आहे. आपल्या नियमांनुसार जे काही करायचं असतं ते करावं लागतं. माझं म्हणणं हे आहे की आपल्याकडे नियम आहेत, कोर्ट आहे त्यामुळे जितक्या लवकरात लवकर निर्णय घेतले जातील तितकं बरं होईल.”

पोलिसांनी आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. पीटीआय आणि स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला गोठ्याकडे नेताना दिसला होता. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले.
आरोपी कोण आहे?
भीमराव कांबळे हा गावात राहणारा ६५ वर्षीय मजूर असून अधूनमधून मजुरीचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात यापूर्वी १९९८ आणि २०१५ मध्ये गुन्हे दाखल झाले होते. मात्र, त्या दोन्ही प्रकरणांत तो निर्दोष सुटला होता. त्याला गावातून15 ते 20 वर्षांपूर्वीच हाकलून देण्यात आलं होतं. या आरोपीने त्याच्या जवळच्या नात्यातील मुलीवरसुद्धा अत्याचार केले होते, अशीही माहिती आहे. याच क्रूर आरोपीने गावातील 65 वय असणाऱ्या महिलेवरही बलात्कार केला होता. गावातील शेतात जाणाऱ्या अनेक महिलांवर त्याची वाईट नजर असायची. त्याच्या घरात त्याची पत्नी आणि एक मुलगा राहत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तेही या ठिकाणी आता राहत नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. सध्या गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याच्या घराच्या आजूबाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
घटना कशी घडली?
पीडित मुलगी सुट्टीसाठी आजीकडे आली होती. घटनेच्या दिवशी आरोपीने तिला गोठ्यात नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून ओळख लपवण्यासाठी दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे. गुन्हा उघड होऊ नये म्हणून आरोपीने मुलीचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत दिले असून पुढील तपास सुरू आहे.
कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार
चिमुरडीचा मृतदेह कडेकोट पोलिस बंदोबस्तात पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आला. तेथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पथकात एकूण ६ अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपासात कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, या उद्देशाने हे पथक काम करणार आहे. बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचे संवेदनशीलता लक्षात घेऊन, या विशेष पथकात २ महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे पीडित कुटुंबाशी संवाद साधणे आणि गुन्ह्यातील तांत्रिक पैलू समजून घेणे सोपे जाणार आहे.
या घटनेनंतर महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, राज्यभरातून नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या घटनेचा निषेध करत सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

