(रत्नागिरी)
रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित किड्स सायक्लोथॉनच्या पूर्वसंध्येला सायकल गौरव पुरस्कार, सायकल कुटुंब गौरव पुरस्कार आणि सायकल योगदान सन्मान पुरस्कारांचे वितरण मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत प्रमुख उपस्थित होते.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सायकलिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘सायकल गौरव पुरस्कार’ देण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत क्लबच्या माध्यमातून हा पुरस्कार एकदा प्रदान करण्यात आला. पहिला मान खेड येथील विनायक वैद्य यांना मिळाला होता. यंदा हा पुरस्कार दापोली येथील अंबरीश गुरव यांना डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सायकलिंग क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहणाऱ्या आणि योगदान देणाऱ्या व्यक्तींनाच गौरवून पुरस्काराची उंची कायम राखण्याची परंपरा रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने जपली आहे.
यावर्षीपासून ‘सायकल कुटूंब गौरव पुरस्कार’ ही नवीन संकल्पना सुरू करण्यात आली. कुटुंबाने एकत्र सायकलिंग केल्यास मुलांमध्येही सायकलिंगची आवड निर्माण होते, या उद्देशाने हा पुरस्कार चिपळूण येथील श्रीनिवास गोखले, सौ. धनश्री गोखले आणि चिरंजीव ईशान यांना त्यांच्या एकत्र सायकलिंगच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास सुमारे ५०० हून अधिक बाल सायकलप्रेमी आणि तितक्याच संख्येने त्यांचे पालक उपस्थित होते. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण परिसर फुलून गेला होता. कोकणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी सायक्लोथॉन असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
‘सायकल योगदान सन्मान’ अंतर्गत लांजा येथील ७० वर्षीय काशीराम पानगले (आतापर्यंत ५१ वर्षांत सुमारे २.५ लाख किमी सायकलिंग पूर्ण केले आहे.), बंगळूर येथील मीरा वेलणकर (विविध सायकल एक्सपिडिशनद्वारे रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व कोकणचा परिचय देशभर पोहोचवला.), निवळी येथील शेतकरीपुत्र सौरभ रावणंग (सांगली येथील ड्युएथलॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या वेळी बोलताना डॉ. उदय सामंत यांनी कोकणातील सायकलिंग संस्कृतीचे कौतुक करत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या उपक्रमांचे विशेष अभिनंदन केले. “कोकणात प्रचंड टॅलेंट आहे आणि अशा विधायक उपक्रमांना मी कायम पाठिंबा देईन,” असे त्यांनी नमूद केले. चिपळूण, खेड, दापोली, लांजा, बेंगळूर तसेच रत्नागिरीतील निवळी अशा विविध भागांतील सायकलिस्टना एकत्र आणून त्यांचा सन्मान करणे म्हणजेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लब खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक असल्याचे गौरवोद्गार या वेळी त्यांनी काढले.
याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, उपाध्यक्ष दर्शन जाधव, भगिरथ प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर, विनायक वैद्य, बाबू म्हाप, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनोज पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रसाद देवधर यांनी ‘सुपरहिरो’ या संकल्पनेवर मार्गदर्शन करत मुलांमध्ये योग्य मूल्ये रुजवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पालक आणि मुलांमधील संवाद वाढवण्याची गरज त्यांनी विशेषतः मांडली.
या सायक्लोथॉनमध्ये गोवा, खेड, दापोली, गुहागर, संगमेश्वर आदी ठिकाणांहून सायकलप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावर्षी तब्बल ५०९ बाल सायकलिस्टांनी सहभाग घेऊन हा उपक्रम कोकणातील सर्वात मोठा सायकलिंग सोहळा ठरला.

