(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोकणातील निसर्ग आणि फुलांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ज्येष्ठ लेखक जे. डी. पराडकर यांच्या ‘ऋतुरंग’ या पुस्तकाला कै. भास्करराव ग. माने स्मृत्यर्थ राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येणार असून, पुरस्कारासाठी पुस्तकाची निवड झाल्याचे पत्र पराडकर यांना प्राप्त झाले आहे.
पुणे येथील चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘ऋतुरंग’ या पुस्तकाची संकल्पना वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोणत्याही कार्यक्रमात पारंपरिक बुके देण्याऐवजी कोकणातील फुलांची माहिती असलेले पुस्तक भेट म्हणून द्यावे, या उद्देशाने चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील यांनी ‘बुक नव्हे, तर बुके’ ही संकल्पना मांडली. याच संकल्पनेतून *‘ऋतुरंग’*ची निर्मिती झाली आहे.
या पुस्तकाला निसर्ग अभ्यासक डॉ. उमेश मुंडल्ये यांची प्रस्तावना, तर तत्कालीन कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची पाठराखण लाभली आहे. दिल्ली येथे झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते.
‘ऋतुरंग’ हे संपूर्ण रंगीत पानांचे पुस्तक असून त्यामध्ये कोकणातील विविध फुलांची छायाचित्रे आणि त्यांची माहिती देण्यात आली आहे. पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ जलरंग चित्रकार विष्णू परीट यांनी साकारले आहे. कोकणातील समृद्ध जैवविविधता, फुलांचे सौंदर्य आणि त्यांची ओळख वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरत आहे.
दरम्यान, ‘ऋतुरंग’ला राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने आणि संस्थापक रवींद्र भारती यांनी लेखक जे. डी. पराडकर तसेच चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
पुरस्कार वितरण सोहळा २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सातारा येथील सोमण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

