(देवरुख)
देवरुखची ग्रामदेवता आणि ४४ खेड्यांची मालकीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोळजाई देवीचा प्रसिद्ध शिंपणे उत्सव उद्या १८ मार्च रोजी उत्साहात साजरा होणार आहे. देवीच्या पालखीचे घरोघरी आगमन झाल्यानंतर आता भाविकांना शिंपणे उत्सवाचे वेध लागले आहेत. लाल रंगात न्हाऊन निघण्यासाठी आणि डिजेच्या तालावर थिरकण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.
नवसाला पावणारी व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी म्हणून सोळजाई देवीची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. देवीचा शिमगोत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. होळी तोडून ती खांद्यावरून नाचवत आणणे, होळी जेठणे, उभी करणे आणि होम झाल्यानंतर देवीची पालखी भक्तांच्या भेटीसाठी नेणे अशा विविध धार्मिक परंपरा यामध्ये पार पडतात.
यावर्षी ५ मार्चपासून मानकरी व कारभारी देवीची पालखी भक्तांच्या भेटीसाठी गावोगावी नेत आहेत. सोळजाई देवीच्या पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे पालखी नाचवली जात नाही तसेच ती कुठेही मुक्कामी राहत नाही. सकाळी मंदिरातून बाहेर पडलेली पालखी रात्री पुन्हा मंदिरातच स्थानापन्न होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता ती पुन्हा भक्तांच्या भेटीसाठी निघते, असा नित्यक्रम सुरू आहे.
यंदाचा शिंपणे उत्सव १८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता गुरववाडी येथे पालखीचे चाक काढल्यानंतर मंदिरात स्थानापन्न केल्यानंतर सुरू होणार आहे. त्यानंतर देवरुख परिसरात पालखीचा फेरा काढण्यात येणार असून ट्रॅक्टरमधून लाल रंगाची उधळण केली जाणार आहे. या वेळी डिजेच्या तालावर तरुणाई जल्लोषात सहभागी होणार आहे

