(रत्नागिरी /प्रतिनिधी)
लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शिक्षणाच्या मंदिरात घडलेला रॅगिंगचा प्रकार चिंताजनक मानला जात असून, ‘कॉमन ऑफ’ घेण्याच्या नावाखाली वरिष्ठ विद्यार्थ्यांनी कनिष्ठांवर दबाव टाकल्याचा आरोप समोर आला आहे. प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना आठ जणांच्या गटाने लक्ष्य करून सातत्याने मानसिक त्रास दिल्याची तक्रार प्राचार्यांकडे दाखल करण्यात आली आहे.
पीडित विद्यार्थ्यांच्या मते, संबंधित वरिष्ठ विद्यार्थी केवळ ‘कॉमन ऑफ’साठी दबाव टाकत नव्हते, तर त्यासाठी शिवीगाळ, धमक्या आणि अपमानास्पद वर्तनाचा मार्ग स्वीकारत होते. महाविद्यालयीन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करून कनिष्ठ विद्यार्थ्यांची मानसिक घुसमट करण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शिक्षण, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी असलेल्या संस्थेत अशा प्रकारे दडपशाहीचे वातावरण तयार होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. रॅगिंगसारख्या विकृत प्रवृत्तीला अजूनही काही विद्यार्थी प्रतिष्ठेचा भाग समजत असतील, तर ती शिक्षण व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या निदर्शनास ही बाब आणल्यानंतर प्रकरण प्राचार्यांकडे पोहोचले असून प्रशासनाने याची दखल घेतली आहे. रत्नागिरी शहर पोलिस यांनीही प्राथमिक माहिती घेतल्याचे समजते; मात्र अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. महाविद्यालयीन वर्तुळात या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “रॅगिंग करणाऱ्यांना वेळीच लगाम घातला नाही, तर अशा प्रवृत्ती अधिक बळावतील,” अशी भावना पालक व विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे. शिक्षणसंस्थांनी केवळ शिस्तीचे फलक लावून न थांबता, कठोर अंमलबजावणी करून दोषींवर उदाहरणात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे.

