(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरीतील सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओच्या कार्याची दखल आता राज्याबाहेरही घेतली जात आहे. आरोग्यसेवेत क्रांती घडवणारी स्वास्थ्य मित्र संस्था जी सध्या जम्मू-काश्मीर, पंजाब, दिल्ली आणि महाराष्ट्रात यशस्वीपणे सेवा बजावत आहे. हिने रत्नागिरीतील या एनजीओला सहकार्याचा हात पुढे केला आहे.
संस्थेचे राज्य व्यवस्थापक व संवेदना फाउंडेशन, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष विनोद चाळके हे आपल्या टीमसह नुकतेच संपर्क युनिक फाउंडेशनच्या रुग्ण मदत केंद्राला भेट देण्यासाठी आले होते. फाउंडेशनच्या कार्याची सविस्तर माहिती घेतल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त करत संस्थेला स्वास्थ्य मित्र संस्थेचे पूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले. यानिमित्ताने फाउंडेशनचा सन्मानही करण्यात आला.
हा सन्मान संपर्क युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी स्विकारला. यावेळी संस्थेचे सचिव युसुफ शिरगावकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जमीर खलफे उपस्थित होते. त्यानंतर एनजीओचे सल्लागार सुहेल मुकादम व रुग्ण मदत केंद्र प्रमुख ईस्माईल नाकाडे यांचीही चाळके यांनी भेट घेतली आणि संस्थेच्या कामाचे मनःपूर्वक कौतुक केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णसेवा, सामाजिक मदत आणि जनजागृती उपक्रमांमुळे संपर्क युनिक फाउंडेशनने निर्माण केलेली ओळख आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचत असल्याचे या प्रसंगी स्पष्ट झाले.

