(रत्नागिरी)
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कौंटी क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याने आपल्या पहिल्याच सामन्यात प्रभावी कामगिरी करत ‘मॅन ऑफ दि मॅच’ पुरस्कार पटकावला आहे. मिडलसेक्स युथ विंग संघाकडून खेळताना त्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच आघाड्यांवर उत्तम प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या सामन्यात अविराजने ३४ चेंडूंमध्ये ४२ धावा ठोकल्या, ज्यामध्ये ७ चौकारांचा समावेश होता. त्याच्या या आक्रमक खेळीने संघाला भक्कम सुरुवात मिळवून दिली. यानंतर गोलंदाजीतही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. ९ षटकांत फक्त ३६ धावा देत २ बळी घेतले. यासोबतच क्षेत्ररक्षणातही दोन अप्रतिम झेल टिपत त्याने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
या बहुआयामी कामगिरीच्या जोरावर अविराजला सामनावीर घोषित करण्यात आले. मिडलसेक्स संघाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या लेगस्पिन गोलंदाजीतील गुगलीचे विशेष कौतुक केले. त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजी आणि खेळातील परिपक्वतेचीही दखल घेतली गेली.
अविराजच्या या पदार्पणामुळे त्याच्याकडून आगामी सामन्यांत आणखी उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही बाब अभिमानास्पद असून, जिल्ह्यातील एक परिपूर्ण खेळाडू आंतरराष्ट्रीय व्यासपीठाकडे वाटचाल करत असल्याचे या कामगिरीतून स्पष्ट होते.