(गणपतीपुळे / वैभव पवार)
प्रबळ इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि न डगमगणारा आत्मविश्वास यांच्या जोरावर मालगुंड येथील साक्षी मोरे हिने महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती होण्याचे आपले स्वप्न अखेर साकार केले आहे. तिच्या या यशाबद्दल सध्या विविध संस्था, संघटना आणि ग्रामस्थांकडून तिचा सन्मान करण्यात येत असून सर्वत्र तिच्या अपार मेहनतीचे कौतुक होत आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत साक्षीने जिद्दीने आपले ध्येय साध्य केले. आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करत तिने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण मालगुंड गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
पोलीस भरतीतील यशाबद्दल बोलताना साक्षीने आपल्या प्रवासातील संघर्ष मोकळेपणाने मांडला. “मी 2020 पासून पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला ही प्रक्रिया सोपी वाटत होती आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे वाटले होते. मात्र प्रत्यक्ष मैदानावर उतरल्यावर स्पर्धेची तीव्रता जाणवली. आपल्यासारखे हजारो जण एकाच ध्येयासाठी झटत आहेत, हे लक्षात आले आणि पोलीस होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल हे स्पष्ट झाले,” असे ती सांगते.
तिने पुढे सांगितले की, अभ्यास आणि शारीरिक तयारी या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने आपल्या दिवसाचे काटेकोर नियोजन केले. “सकाळी मैदानावर सराव, त्यानंतर अभ्यास आणि संध्याकाळी पुन्हा प्रॅक्टिस, असा दिनक्रम ठरवला,” असे ती म्हणाली.
या प्रवासात तिला अभ्यासासाठी श्री. हेरंब पोंक्षे (पोंक्षे अभ्यासिका) यांचे मार्गदर्शन मिळाले, तर शारीरिक प्रशिक्षणासाठी सौ. सोनम सुरज भोळे (आयांश विरेन अकॅडमी) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या दोन्ही मार्गदर्शकांच्या मदतीने साक्षीने आपली तयारी अधिक सक्षम केली.
पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतरही साक्षी खचली नाही. मात्र 2024 मध्ये दुसऱ्यांदा अपयश आल्यावर ती काही काळ निराश झाली. “इतके प्रयत्न करूनही यश मिळत नाही यामुळे खूप खचले, रडूही आले. पण स्वतःला सावरत पुन्हा उभे राहण्याचा निर्धार केला,” असे ती भावूक होत सांगते.
2025 मध्ये पुन्हा भरतीची संधी मिळणार असल्याचे समजताच तिने नव्या जोमाने तयारी सुरू केली. सातत्यपूर्ण सराव, अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अखेर 2026 मध्ये तिची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड झाली.
साक्षीचा हा खडतर पण प्रेरणादायी प्रवास आता अनेक तरुणींसाठी मार्गदर्शक ठरत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींना जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.
तिच्या या यशाबद्दल मालगुंड गावासह परिसरातील विविध संस्था, संघटना आणि नागरिकांकडून तिचे सत्कार करण्यात येत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

