(मुंबई)
जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसह व्यावसायिकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ केली असून नवीन दर आज 1 जून 2026 पासून लागू झाले आहेत. या दरवाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग आणि खाद्य व्यवसायांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापारी, हॉटेल चालक आणि लघुउद्योजकांवरील आर्थिक भार वाढणार आहे. परिणामी खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढू शकतात.
कमर्शियल सिलिंडरमध्ये मोठी वाढ
अलीकडील भू-राजकीय तणाव, आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि पुरवठा साखळीवरील दबावामुळे कमर्शियल एलपीजीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. गेल्या काही काळात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 1,373 रुपयांची वाढ नोंदवली गेली असून, त्यामध्ये मागील महिन्यात झालेल्या 993 रुपयांच्या विक्रमी वाढीचाही समावेश आहे.
आज (1 जून) पासून 5 किलोच्या एफटीएल एलपीजी सिलेंडरच्या दरातही 11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती सिलेंडरचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आले असून लहान व्यावसायिकांना या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी 5 किलोच्या एफटीएल (Free Trade LPG) सिलेंडरच्या दरात 11 रुपयांची वाढ केली असून नवीन दर आजपासून लागू करण्यात आले आहेत.
11 रुपयांची वाढ किरकोळ वाटत असली तरी, सतत वाढणाऱ्या कच्चा माल, वीज आणि वाहतूक खर्चाच्या पार्श्वभूमीवर लहान व्यवसायांसाठी हा अतिरिक्त आर्थिक भार ठरू शकतो. या दरवाढीमुळे लहान व्यावसायिक, चहाचे स्टॉल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि कमी प्रमाणात एलपीजी वापरणाऱ्या ग्राहकांच्या खर्चात वाढ होणार आहे.
एफटीएल सिलेंडर म्हणजे काय?
एफटीएल (Free Trade LPG) सिलेंडर हा नियमित 14.2 किलोच्या घरगुती अनुदानित सिलेंडरपेक्षा वेगळा असतो. 5 किलो क्षमतेचा हा सिलेंडर प्रामुख्याने लहान दुकाने, फूड स्टॉल, तात्पुरती स्वयंपाकघरे, पर्यटनस्थळे आणि प्रवासादरम्यान वापरला जातो. ज्यांना कमी प्रमाणात गॅसची गरज असते किंवा वारंवार स्थलांतर करावे लागते, त्यांच्यासाठी हा सिलेंडर अधिक सोयीचा मानला जातो.
घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर कायम
दरम्यान, घरगुती ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या घरगुती सिलिंडर 916.50 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच 5 किलोचा छोटा घरगुती सिलिंडर 339 रुपयांना, तर 10 किलो एक्स्ट्रालाइट एलपीजी सिलिंडर 652 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती वाढत राहिल्यास आगामी काळात घरगुती गॅसच्या दरांचाही फेरआढावा घेतला जाऊ शकतो.
औद्योगिक सिलिंडरही महागले
केवळ कमर्शियलच नव्हे तर औद्योगिक वापरातील एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे.
- 47.5 किलो औद्योगिक एलपीजी सिलिंडर : 105 रुपयांनी वाढून 7,779.50 रुपये
- 425 किलो एलपीजी सिलिंडर : 69,651 रुपये
या वाढीचा परिणाम विविध उद्योग, उत्पादन क्षेत्र आणि व्यावसायिक प्रकल्पांवर होण्याची शक्यता आहे.
एलपीजीच्या किमती का वाढल्या?
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी दरांचा आढावा घेतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि ऊर्जा क्षेत्रातील बदलांनुसार किंमतीत वाढ किंवा घट केली जाते. अलिकडच्या काळात जागतिक ऊर्जा बाजारावर दबाव वाढला असून मध्यपूर्वेतील तणाव आणि पुरवठ्याबाबतची अनिश्चितता यामुळे एलपीजीच्या किमतींवर परिणाम झाल्याचे मानले जात आहे.
घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर कायम
दरम्यान, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेल कंपन्यांनी घरगुती ग्राहकांना दिलासा देत सध्याचे दर कायम ठेवले आहेत. तज्ज्ञांच्या मते, जागतिक ऊर्जा बाजारातील परिस्थिती पाहता पुढील काही महिन्यांत एलपीजी दरांचा पुन्हा आढावा घेतला जाऊ शकतो.
पेट्रोल, डिझेल आणि एटीएफवरील निर्यात शुल्कात कपात
दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (ATF) यांच्या निर्यातीवरील शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे. नवीन आजपासून लागू झाले आहेत.
- पेट्रोल निर्यात शुल्क : ₹1.5 प्रति लिटर
- डिझेल निर्यात शुल्क : ₹13.5 प्रति लिटर
- एटीएफ निर्यात शुल्क : ₹9.5 प्रति लिटर
मात्र देशांतर्गत वापरासाठीच्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याने वाहनचालकांना सध्या कोणताही थेट परिणाम जाणवणार नाही. ऊर्जा बाजारातील वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आता एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुढील काळात काय बदल होतात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

