(चिपळूण)
उन्हाळी सुट्टीसाठी मामाकडे आलेल्या चिपळूण येथील १६ वर्षीय मुलाचा दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राधानगरी तालुक्यात घडली आहे. स्वराज्य संदीप शिंदे (रा. ओवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्वराज्य सध्या शिक्षणासाठी इंद्रायणीनगर भोसरी पुणे येथे वास्तव्याला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा संपल्यानंतर स्वराज्य हा कोल्हापूरमधील कळंबा येथे आपल्या मामाकडे सुट्टीसाठी आला होता. बुधवारी तो मामा ओंकार पाटील आणि त्यांच्या मित्रांसोबत काळमावाडी धरण परिसरात फिरायला गेला होता. यावेळी सर्वजण दूधगंगा नदीत पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने स्वराज्य खोल डोहात बुडाला.
तो बराच वेळ पाण्याबाहेर न आल्याने सोबतच्या लोकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिसांत नोंद करण्यात आली. रात्री अंधारामुळे शोधमोहीम थांबवावी लागली होती.
गुरुवारी सकाळी स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. सकाळी सुमारे १० वाजता काळोख्या डोहातून स्वराज्यचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
स्वराज्य हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील दुबई येथे नोकरीस असून, त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे ओवळी गावासह चिपळूण आणि राधानगरी परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतदेहाचे राधानगरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

