(रत्नागिरी /प्रतिनिधी)
देवरुखहून परतताना पांगरी येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या विकास चंद्रकांत कांबळे याला उपचारासाठी आता रत्नागिरीतील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. भीषण अपघातानंतर मृत्यूशी सामना करत विकास चंद्रकांत कांबळे सध्या जीवनासाठी कठोर झुंज देत आहे. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तो अजूनही कोमामध्ये असून, सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हातखंबा येथील तरुणांचा हा अपघात रविवारी (दि. २६ एप्रिल) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला होता. देवरुख येथे विवाह सोहळा आटपून परतत असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या या दुर्घटनेत सुमित विलास कांबळे आणि विकास काशीराम कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर विकास चंद्रकांत कांबळे गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने विकासला उपचारासाठी दाखल केल्यापासून तो कोमामध्ये आहे.
एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या उपचारासाठी नातेवाईकांसह कुटुंबीयांनी तातडीने पुढाकार घेत रत्नागिरीतील प्रख्यात न्यूरो सर्जन डॉ. चौधरी यांची भेट घेतली. सर्व वैद्यकीय अहवालांचा आढावा घेतल्यानंतर डॉक्टरांनीही उपचार करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सोमवारी (दि. २७ एप्रिल) सकाळी विकास कांबळे याला जिल्हा रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.
यावेळी जखमी विकास कांबळे याला जिल्हा शासकीय रुग्णालयातून साळवी स्टॉप येथील खाजगी रुग्णालयात हलविताना सुसज्ज कार्डियाक रुग्णवाहिकेची तातडीची गरज निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच पंचायत समितीच्या सदस्या डॉ. पद्मजा कांबळे यांनी विलंब न करता पुढाकार घेत आपली अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यांच्या या तत्पर आणि संवेदनशील प्रतिसादामुळे कोमामध्ये असलेल्या विकासला आवश्यक ती वैद्यकीय काळजी घेत अल्पावधीत सुरक्षितपणे हलविणे शक्य झाले.
दरम्यान त्याच संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असून तो अद्यापही कोमामध्येच आहे. लग्नाच्या वयात आयुष्याची नवी स्वप्ने पाहणारा विकास चंद्रकांत कांबळे आज मात्र मृत्यूशी झुंज देत आहे. एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबीयांच्या आशा-अपेक्षा त्याच्यावर खिळून आहेत. प्रत्येक क्षण अनिश्चिततेचा असला, तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी विकासची सुरू असलेली झुंज आणि डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत असून, सर्वांची नजर आता त्याच्या प्रकृतीकडे लागून राहिली आहे.

