(गणपतीपुळे / वैभव पवार)
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा – मालगुंड, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती मालगुंड, कवी केशवसुत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय मालगुंड आणि युवाशक्ती शाखा मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने “श्रावणधारा मनामनात” या उपक्रमाचे शनिवार दिनांक २६ जुलै २०२५ रोजी कवी केशवसुत स्मारक मालगुंड याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड यांच्या वतीने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या माध्यमातून मालगुंड व मालगुंड परिसरातील अनेक नव्याने लिहिणाऱ्या व कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या साहित्यप्रेमी व्यक्तींना संधी उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, सहभागी होणार आहेत.
प्रत्येक शाळा, महाविद्यालय यातून प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे. यावेळी शालेय गट आणि महाविद्यालयीन गटातील प्रत्येक स्पर्धकाने पाऊस या विषयांवर, मराठी भाषेत, स्वतः लिहिलेली ३ ते ४ कडव्याची कविता, प्रस्तावना न करता सादर करायची आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व सहभागी कवींना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार असून, महत्वाचे म्हणजे उत्कृष्ट कविता सादर करणाऱ्या दोन कवींना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध साहित्यिक उपक्रमात, मान्यवर कवींच्या उपस्थितीत कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणा-या कवींनी शालेय गटासाठी शुभदा मुळ्ये, विलास राणे, उज्जवला बापट, शालेय – महाविद्यालयीन गटासाठी अरुण मोर्ये तर खुल्या गटासाठी रामानंद लिमये व अमेय धोपटकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड, कवी केशवसुत स्मारक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि खुल्या गटातील कवी, यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या अध्यक्षा नलिनी खेर, कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसाप मालगुंडच्या कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये, सचिव विलास राणे, कोमसाप युवाशक्तीचे दक्षिण कोकण विभागप्रमुख अरुण मोर्ये, रामानंद लिमये यांनी केले आहे.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोमसाप शाखा मालगुंड, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे सदस्य, कर्मचारी मोठया प्रमाणात प्रयत्न करत आहेत.