(रत्नागिरी)
शहरातील क्रांतीनगर परिसरातील कचरा डेपोत शनिवारी सायंकाळी नवजात अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या अमानुष कृत्यामागील माता-पित्यांचा शोध शहर पोलिसांकडून वेगाने सुरू असून, प्राथमिक तपासात अर्भक घटनास्थळी वाहनातून आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
अर्भक सापडताच शहर पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले. श्वान पथकाने कचरा डेपो परिसरातील झोपडपट्टीतून माग काढत मुख्य रस्त्यापर्यंत तपास केला. मात्र, रस्त्याजवळ श्वान घुटमळत राहिल्याने अर्भक तेथे वाहनाद्वारे आणून टाकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी नोंदवला आहे.
दरम्यान, सदर नवजात अर्भकाला जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाल अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर आणि समाधानकारक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची हालचाल आणि रुग्णालयीन नोंदी तपासल्या जात आहेत. पोलिसांकडून नागरिकांनाही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

