(रत्नागिरी)
शहरातील साळवी स्टॉप परिसरात शुक्रवारी दुपारी एका हेअर स्टुडिओ दुकानाला अचानक लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात असून घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणली. आग विझविण्यात यश आले असले तरी दुकानातील खुर्च्या तसेच अन्य साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. परिणामी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे समजते.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुपारच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने स्थानिकांमध्ये काही काळ खळबळ माजली होती.

