(मुंबई)
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने पोलिस खात्यात मोठे फेरबदल करत 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. 1 मेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे प्रशासनात मोठी हालचाल झाली असून, मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. याआधीही राज्य सरकारकडून आयएएस आणि आयपीएस स्तरावर बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी झालेल्या फेरबदलात सायबर सुरक्षा, गुप्तवार्ता विभाग, शहर पोलीस आणि जिल्हा पातळीवरील महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कुणाची कुठे बदली?
- जालना पोलीस अधीक्षक अजय के. बन्सल → पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र
- अमरावती पोलीस अधीक्षक सिंगुरी विशाल आनंद → धुळे पोलीस अधीक्षक
- नाशिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील → मुंबई शहर पोलीस उपायुक्त
- अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे → सहायक पोलीस महानिरीक्षक, महासंचालनालय
- परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी → राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई (उप आयुक्त)
- राज्य गुप्तवार्ता विभागाचे संदीप घुगे → मुंबई शहर पोलीस उपायुक्त
- नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त → एडीजी (विशेष कृती) स्टाफ ऑफिसर
- चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन → अहिल्यानगर पोलीस अधीक्षक
- ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक धोडोंपत स्वामी → नाशिक पोलीस अधीक्षक
- वाशिम पोलीस अधीक्षक अनुज तारे → पुणे, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
- नगरी हक्क संरक्षणचे अनुराग जैन → मुंबई शहर पोलीस अधीक्षक
- पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक अश्विनी सानप → नंदुरबार पोलीस अधीक्षक
- मालेगाव अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू → जालना पोलीस अधीक्षक
या बदल्यांमुळे मुंबई, ठाणे, धुळे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, परभणी, जालना यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांतील पोलिस यंत्रणेत नव्या नेतृत्वाची सुरुवात होणार आहे. विशेषतः सायबर सुरक्षा आणि गुप्तवार्ता विभागात करण्यात आलेल्या नियुक्त्यांकडे लक्ष वेधले जात आहे.
या अचानक झालेल्या मोठ्या फेरबदलामागील नेमके कारण काय, याबाबत अधिकृत खुलासा झालेला नसला तरी प्रशासनात कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात या बदल्यांचा काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

