(राजापूर /तुषार पाचलकर)
राजापूर–लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांचा वाढदिवस 7 जानेवारी रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राजापूर, लांजा, साखरपा तसेच रत्नागिरी परिसरात कार्यकर्ते, हितचिंतक आणि चाहत्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील पाचल येथील तरुण उद्योजक अमित साळवी यांनी राबवलेला उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अमित साळवी हे पाचल येथील रहिवासी असून गेल्या दहा वर्षांपासून “गायत्री डिस्ट्रिब्युटर्स” या माध्यमातून औषधे व वैद्यकीय साहित्याचा व्यवसाय करत आहेत. ते पाचल येथील ज्येष्ठ शिवसैनिक व माजी विभागप्रमुख आप्पा साळवी यांचे चिरंजीव तसेच तळवडे ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच सौ. गायत्री साळवी यांचे पती आहेत. साळवी कुटुंबीय अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत आहे. व्यवसाय सांभाळत समाजासाठी काहीतरी देण्याची भावना अमित साळवी सातत्याने जपत आहेत.
आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वसामान्य नागरिक आरोग्याबाबत जागरूक असले तरी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलिस बांधवांना आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. व्यस्त दिनचर्येमुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसतो. ही बाब लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अमित साळवी यांनी लांजा, राजापूर आणि नाटे पोलिस स्थानकांतील सुमारे 150 पोलिस बांधवांना पट्टीसह शुगर टेस्ट मशीन किटचे वाटप केले.
या किटमुळे पोलिस बांधवांना घरच्या घरीच रक्तातील साखरेची तपासणी करणे शक्य होणार असून, त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्यास मदत होणार आहे.
दि. 7 जानेवारी रोजी आमदार किरण (भैय्या) सामंत आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्या अपूर्वाताई सामंत यांच्या हस्ते या शुगर टेस्ट मशीन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस बांधवांनी अमित साळवी तसेच सामंत कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले.
अमित साळवी यांनी राबवलेल्या या अनोख्या आणि उपयुक्त उपक्रमाचे पोलिस बांधवांसह सर्वसामान्य नागरिकांकडूनही विशेष कौतुक होत आहे.

