(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली तरबंदर व जैतापूर परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाबाबत तक्रार केल्याच्या रागातून, वाळू माफियांनी तक्रारदाराला प्रत्यक्ष गाठून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तक्रारदार श्री. रुपेंद्र विलास कोठारकर यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे दाद मागून संरक्षण व कारवाईची मागणी केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, धाऊलवल्ली व जैतापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. याबाबत कोठारकर यांनी वेळोवेळी स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. उलट, या तक्रारींची कुणकुण लागताच संबंधित वाळू व्यावसायिकांनी २२ एप्रिल २०२६ रोजी कोठारकर यांच्या भावाच्या हॉटेलजवळ त्यांना गाठले.
“आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही”
धमकी देताना वाळू माफियांनी मुजोरीची सीमा गाठली. “आम्ही सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पैसे पुरवतो, तुला काय करायचे ते करून घे, आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी कोठारकर यांना धमकावले. तसेच, पुन्हा तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
सततच्या तक्रारींनंतरही कारवाई होत नसल्याने आणि आता थेट जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने कोठारकर कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भविष्यात आपल्यावर किंवा कुटुंबावर काही ओढवल्यास त्याला हे अवैध वाळू व्यावसायिकच जबाबदार असतील, असे कोठारकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
या पत्राच्या प्रती जिल्हा खनिकर्म विभाग, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता जिल्हा प्रशासन या मुजोर वाळू माफियांवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

