(मुंबई)
विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपत आहे. या निवडणुकीत एका पोटनिवडणुकीचाही समावेश असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी आपापले उमेदवार जाहीर केल्याने निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
जागावाटपानुसार महायुतीत भाजपच्या वाट्याला सहा, शिंदे गटाच्या शिवसेनेला दोन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा आहे.
भाजपकडून सुनिल कर्जतकर, डॉ. माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच पोटनिवडणुकीसाठी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे.
शिंदे गटाच्या शिवसेनेकडून माजी मंत्री बच्चू कडू आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. ही घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, ठाकरे गटाने काँग्रेसशी चर्चा न करता उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. सुरुवातीला काँग्रेसने उमेदवार देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, ठाकरे गटाचे नेते अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई आणि सचिन आहिर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन उमेदवार न देण्याची विनंती केली. त्यानंतर काँग्रेसने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरेसेनेचे अनिल देसाई यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
उद्धव ठाकरे यांचा निर्णय हा मविआचा निर्णय आहे. उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरावा, अशी आमची भूमिका होती. पण त्यांनी माघार घेत दानवेंना उमेदवारी दिली. हा निर्णय आम्हाला मान्य आहे, आमचा अंबादास दानवे यांना पाठिंबा असेल. आमच्याकडून कुठालाही दुसरा अर्ज भरला जाणार नाही. मविआ म्हणून आम्ही एकत्र आहोत, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२८ मतांचा कोटा निर्णायक
विधानपरिषदेचा एक सदस्य निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. सध्याच्या संख्याबळानुसार विधानसभेत भाजपकडे १३१, शिंदे गटाच्या शिवसेनेकडे ५७, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४० आमदार आहेत. तर महाविकास आघाडीत ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे २०, काँग्रेसकडे १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे १० आमदार आहेत. या आकडेवारीनुसार महायुतीचे आठ आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता आहे.

