(रत्नागिरी / वार्ताहर)
समाजातील स्नेहबंध दृढ करण्यासोबतच एकजूट आणि सामूहिक बांधिलकीची भावना रुजवण्यात सामाजिक मंडळांचे योगदान महत्त्वाचे असते. क्षत्रिय मराठा मंडळाने गेल्या १९ वर्षांत दर्जेदार आणि समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजाला एकत्र आणण्याचे काम केले आहे. अशा उपक्रमांमधून निर्माण होणारी एकजूट आणि परस्परांतील जिव्हाळा यांच्याच बळावर मराठा बिझनेसमन फोरम (एमबीएफ) यासारखी मोठी व्यावसायिक संघटना उभी राहू शकते. भावी पिढीच्या दृष्टीने ही सामूहिक बांधिलकी महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन देशातील नामवंत मानव संसाधन प्रमुख, व्यवसाय उत्कृष्टता आणि नेतृत्व प्रशिक्षक राजेंद्र घाग यांनी केले.
क्षत्रिय मराठा मंडळाच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये आयोजित रंगारंग सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे, प्रमुख पाहुणे व फणस उद्योजक मिथिलेश देसाई, रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मंडळाच्या उपाध्यक्ष प्राची शिंदे, कार्याध्यक्ष राकेश नलावडे, खजिनदार जितेंद्र विचारे, प्रचारप्रमुख संतोष तावडे आणि ज्येष्ठ सल्लागार सतीश साळवी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि माता तुळजाभवानी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांचे स्वागत उपाध्यक्ष प्राची शिंदे यांनी केले.
दरवर्षीच्या परंपरेनुसार सकाळी माता श्री तुळजाभवानी यांच्या मूर्तीची पूजा आणि आरती करण्यात आली. सायंकाळच्या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. श्रेया पाटील हिने सादर केलेल्या गणेशवंदनेवर श्रावणी सावंत हिने भरतनाट्यम् सादर केले. त्यानंतर वर्षभरात निधन झालेल्या मंडळाच्या सभासदांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मिथिलेश देसाई यांना ‘क्षत्रिय मराठा समाजगौरव’ पुरस्कार
कार्यक्रमातील विशेष सोहळ्यात लांजा येथील फणसकिंग मिथिलेश देसाई यांना ‘क्षत्रिय मराठा समाजगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांचे वडील हरिश्चंद्र देसाई यांचेही अभिनंदन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिथिलेश देसाई यांच्याशी संवाद साधून त्यांच्या फणसकिंग म्हणून झालेल्या प्रवासाची माहिती घेतली होती.
आपल्या भाषणात मिथिलेश देसाई यांनी कोकणातील फणस जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा प्रवास उलगडला. स्वतःच्या समाजाकडून मिळालेल्या गौरवाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांच्या कुटुंबात दोन पिढ्यांपासून सुरू असलेल्या फणस उत्पादनाचे महत्त्व आणि फणसापासून विविध जोडउत्पादने तयार करण्याच्या संधी याविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांचा गुणगौरव; ज्येष्ठ सभासदांचा सन्मान
वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मंडळाच्या परंपरेनुसार ९० वर्षांवरील आजीव सभासदांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ७५ वर्षांवरील सभासदांचाही कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी, शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेते तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. दरवर्षीप्रमाणे आयोजित लकी ड्रॉ सोडतीने कार्यक्रमात आणखी रंगत आणली.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय कौस्तुभ सावंत यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित कदम आणि मंडळाचे सचिव योगेश साळवी यांनी केले, तर उद्योजक जितेंद्र सावंत यांनी आभार मानले.
‘मराठी बाणा’ कार्यक्रमाला रसिकांची पसंती
वर्धापनदिन सोहळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रम नृत्यदिग्दर्शक अमित कदम यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला. कस्तुरी सावंत हिने भरतनाट्यम् सादर केले, तर अनन्या देसाई हिने ‘जोगवा’ सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. अन्वयी कदम हिने आईविषयीच्या हळव्या आणि मनाला भिडणाऱ्या भावना कवितेतून व्यक्त केल्या.
महाराष्ट्राची संस्कृती आणि विविध सणांचे दर्शन घडवणाऱ्या ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. विविध सांस्कृतिक सादरीकरणे, गुणवंतांचा गौरव आणि समाजातील ज्येष्ठांचा सन्मान अशा उपक्रमांनी क्षत्रिय मराठा मंडळाचा १९ वा वर्धापनदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.


