(देवळे / प्रकाश चाळके)
रत्नागिरी नागपूर रस्त्यावरील संगमेश्वर तालुक्यातील देवळे फाट्यावर पॅसेंजर ची वाट बघत उभी असलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने रिक्षात असलेल्या चालकाचा रिक्षा बाहेर उडून जागीच मृत्यू झाला असून ही घटना आज (गुरुवार) सकाळी 10.30 च्या सुमारास घडली.
चाफवली बौद्ध वाडी येथील रिक्षा व्यवसायिक विजय पांडुरंग कांबळे वय (62) आपली रिक्षा क्र . MH.08 – AO – 2191 घेऊन नेहमीप्रमाणे रत्नागिरी-नागपूर रस्त्यावरील देवळे फाटा येथे रिक्षा उभी करून पॅसेंजरची वाट बघत असताना अज्ञात वाहनाने मागून येऊन त्यांच्या रिक्षाला जबरदस्त धडक देऊन रिक्षाचा मागच्या बाजूला चेंदामेंदा केला असून रिक्षात पुढे बसलेल्या विजय पांडुरंग कांबळे यांना रिक्षा बाहेर फेकले गेल्याने रस्त्यावर घासत त्यांचा मृत्यू झाला. ही धडक एवढी जोरात होती की रिक्षा फरपटत सुमारे दहा फूट पुढे नेले असून अज्ञात वाहनाने धडक देऊन आपली गाडी पुन्हा रिव्हर्स घेतली व कोल्हापूरच्या दिशेने सुसाट घेऊन गेला, असे सुमारे 250 ते 300 फूट लांब असलेल्या रस्ता कामगार यांनी सांगितले. ही गाडी स्कॉर्पिओ सदृश असून काळया रंगाची असल्याचे त्यांनी सांगितले. या रिक्षा जवळ संदीप अनंत कांबळेही होते. परंतु ते त्याच वेळेत जरा बाजूला गेल्याने मग परत येईपर्यंत ती गाडी सुसाट गेल्याने पूर्ण दिसली नसल्याचे त्याने म्हटले आहे.
विजय कांबळे यांना त्वरित देवळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु डॉ. तुषार चोपडे यांनी त्याला मृत घोषित केले. आ. भैय्या सामंत यांच्या ॲम्बुलन्सने विजय कांबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी साखरपा प्रा.आ. केंद्रात नेण्यात आला. यावेळी चाफवली, देवळे, दाभोळे, बौद्ध वाडीतील तसेच देवळेतील रिक्षा चालक, चाफवली उपसरपंच विजय घुमे देवळे पोलीस पाटील विजीत साळवी, शिवू शेटये, बंड्या परशेटये दाभोळे उपसरपंच किरण दाभोळकर, उदय कांबळे उपस्थित होते.
या अपघाताचे वृत्त समजतात देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे साखरपा दुरक्षेत्राचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघाटे सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे पो. हवालदार सचिन पवार पोलीस हवालदार सचिन कामेरकर हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस यंत्रणेमार्फत चालू आहे.
नागपूर रत्नागिरी महामार्ग वर ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्याच्या बाजूने तीन मोठ्या गाड्या पास होऊ शकतात एवढा मोठा रस्ता असताना रस्त्याच्या साईट पट्टीच्या बाजूला उभी असलेल्या रिक्षाला सदर अज्ञात वाहनाने उभ्या रिक्षाला ठोकर दिली अज्ञात वाहनाचालकाची कोणतीही चूक नसताना नाहक जीव गेल्याचे परिसरात बोलले जात आहे.

