(देवळे / प्रकाश चाळके)
राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण भैय्या सामंत यांनी दिलेला शब्द पाळत कोंडगाव (साखरपा) बाजारपेठेतील रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी अर्थसंकल्प 2026 मधून निधी मंजूर करून घेतला आहे. या निर्णयामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
साखरपा दौऱ्यादरम्यान आमदार सामंत यांनी कोंडगाव बाजारपेठेतील रस्ता काँक्रीट करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मार्च 2026 च्या अर्थसंकल्पात या कामासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कोंडगावसह पंचक्रोशीतील नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे.
मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आमदार सामंत यांनी विविध विकासकामांना गती दिली आहे. गेल्या दीड वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा योजना, पूल, साकव, नवीन वर्गखोल्या, अंगणवाडी इमारती, ग्रामपंचायत इमारती, सामाजिक सभागृहे, व्यायामशाळा, धरणे, जेट्टी अशा अनेक कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्या कार्याबाबत समाधान आणि विश्वास वाढला आहे.
दरम्यान, आगामी पावसाळी अधिवेशनात साखरपा-भडकंबा-देवडे तसेच देवळे-मेघी-देवरुख या रस्त्यांच्या नूतनीकरणासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.

