(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आदर्श जीवन शिक्षण शाळा, मालगुंड नंबर एक शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाचा भव्य सांगता समारंभ शनिवार दि. २ मे व रविवार दि. ३ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
ब्रिटिशकालीन परंपरा असलेल्या या शाळेची स्थापना ५ ऑगस्ट १८५१ रोजी झाली. चालू वर्षी शाळेने १७५ वर्षांचा प्रदीर्घ शैक्षणिक प्रवास पूर्ण केला असून, २०२५-२६ हे वर्ष ‘शतकोत्तर अमृत महोत्सव वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. वर्षभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हा महोत्सव साजरा करण्यात आला असून, त्याचा समारोप या भव्य कार्यक्रमाने होणार आहे.
२ मे रोजीचा कार्यक्रम
शनिवार, दि. २ मे रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत ब.प. विद्यालय ते मालगुंड नंबर एक शाळा असा शोभायात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यामध्ये मान्यवरांचे स्वागत, प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन, मान्यवरांचा सत्कार तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. पुढे मान्यवरांची मनोगते, अध्यक्षीय भाषण, आभार प्रदर्शन आणि पसायदान असा कार्यक्रम होईल.
दुपारी १ ते २ या वेळेत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी ४ ते ५ या वेळेत प्रसिद्ध व्याख्याते माधव अंकलगे यांचे ‘शिक्षण पद्धती : काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत.
३ मे रोजीचा कार्यक्रम
रविवार, दि. ३ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत माजी विद्यार्थी व माजी शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला असून, यामध्ये शालेय आठवणींना उजाळा देत मनोगते मांडली जाणार आहेत. दुपारी १ ते २ या वेळेत भोजन होईल. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात येणार असून, रात्री १० वाजता शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त श्री शिव स्वयंभू मठेश्वर नाट्य नमन मंडळ, भोके मठवाडी (रत्नागिरी) यांचा विशेष करमणुकीचा कार्यक्रम सादर होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, प्राथमिक शिक्षणाधिकारी नीलिमा नाईक, गटविकास अधिकारी चेतन शेळके, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, उपसभापती गजानन धनावडे, गट शिक्षणाधिकारी वैभव डुबळ, जिल्हा परिषद सदस्य राजेश साळवी, पंचायत समिती सदस्य पूर्वा दुर्गवळी, माजी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोतावार, सरपंच श्वेता खेऊर, पोलीस निरीक्षक संजय पाटील, कवी केशवसुत समितीचे अध्यक्ष गजानन पाटील तसेच संस्थान श्री देव गणपतीपुळेचे सरपंच निलेश कोल्हटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

