(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील परटवणे परिसरात एका ४७ वर्षीय व्यक्तीने दीर्घकाळच्या आजाराला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अशोक प्रकाश खेडेकर (रा. खेडेकरवाडी, परटवणे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खेडेकर यांना गेल्या महिन्याभरापासून कावीळचा त्रास होत होता. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. २८ एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या पत्नी विनया खेडेकर या नेहमीप्रमाणे घरकामासाठी बाहेर गेल्या होत्या. सकाळी सुमारे १०.५२ वाजता त्या घरी परतल्या असता, अशोक यांनी घरातील लोखंडी चॅनलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तातडीने शेजारी सुरेश खेडेकर यांना मदतीसाठी पाचारण केले. दोघांनी मिळून अशोक यांना खाली उतरवून तातडीने रिक्षाने जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती यांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पथक रुग्णालयात दाखल झाले. पंचनामा करून बी. एन. एस. एस. कलम ११४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजारपणातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

