(चिपळूण)
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील Laxmi Organic Industries या कंपनीविरोधात लवकरच परिषद घेऊन भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा कोकण पर्यावरण संघर्ष समितीने केली आहे. माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
परिसरातील गावागावांत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठका सुरू असून ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दलवाई यांनी सांगितले. “सरकार आणि काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ही कंपनी सुरू झाली. येथे घातक रसायनांचे उत्पादन घेतले जात असल्याची माहिती सरकारला आहे. तरीही ठोस पावले उचलली जात नाहीत,” असा आरोप त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी लोटे येथे भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘कंपनी कोकणासाठी घातक ठरल्यास ती बंद करण्यात येईल,’ असे वक्तव्य केले होते. मात्र, “ही भूमिका केवळ शब्दांपुरती मर्यादित राहू नये. सरकारला कंपनीच्या परिणामांविषयी वस्तुनिष्ठ माहिती हवी असेल, तर स्थानिक नागरिकांशी संवाद का साधला जात नाही?” असा सवाल दलवाई यांनी उपस्थित केला.
सरकारच्या निर्णयाची वाट पाहण्याऐवजी व्यापक लोकसंघटन उभी करून संघर्ष उभारण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे. आयनी, असगणी, दाभोळ, मेटे, कोतवली, घाणेकुंट, सात्विंगाव, लवेल, सोनगाव, मालदोली आदी गावांत झालेल्या बैठकींमध्ये ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा दर्शविल्याचे त्यांनी नमूद केले.
लवकरच आयोजित परिषदेत महत्त्वाचे ठराव मंजूर करून ते शासनाकडे पाठवण्यात येणार असून, कंपनीला टाळे ठोकण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात येईल, असेही दलवाई यांनी स्पष्ट केले. कोकणातील पर्यावरणीय प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची चिन्हे या घोषणेमुळे स्पष्ट झाली आहेत.

