(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहराला लागून असलेल्या मिरजोळे परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरजोळे येथील सोनारवाडी भागातील जंगल परिसरात बिबट्याने एकाच रात्रीत चार गुरांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यापैकी एका गुराचा बिबट्याने अक्षरशः फडशा पाडल्याने या घटनेची तीव्रता अधिकच अधोरेखित झाली आहे.
गुरे जंगल परिसरात चरण्यासाठी सोडण्यात आली असताना बिबट्याने दबा धरून हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच ठिकाणी चार गुरे ठार झाल्याने सोनारवाडी तसेच संपूर्ण मिरजोळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य रत्नदीप पाटील यांनी तातडीने वनविभागाला याची खबर दिली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून मृत गुरांचे नियमानुसार दफन करण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून मिरजोळे, शिळ तसेच आंब्याच्या बागेमध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढत असल्याचे चित्र आहे. या भागांत यापूर्वीही गुरे, शेळ्या तसेच पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. विशेषतः कुत्र्यांची शिकार होण्याचे प्रमाण लक्षणीय असून बागायतींमध्ये काम करणाऱ्या गुराख्यांना अनेकदा प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन होत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
सुमारे तीन वर्षांपूर्वी गावालगतच्या माळरानावर सडलेल्या अवस्थेत एक बिबट्याही आढळून आला होता. अलिकडेच मिरजोळेला लागून असलेल्या खेडशी येथील डफळचोळवाडी परिसरातही बिबट्याचा वावर वाढला असून ग्रामस्थांच्या घरांच्या अंगणात बांधलेल्या कुत्र्यांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. रात्रीच्या वेळी सातत्याने होणाऱ्या बिबट्याच्या हालचालींमुळे डफळचोळवाडी वाडीतील ग्रामस्थांमध्येही प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सोनारवाडीतील गुरांवरील या ताज्या आणि मोठ्या हल्ल्यामुळे संपूर्ण मिरजोळे व लगतच्या परिसरात भीतीचे सावट पसरले असून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

