(रत्नागिरी)
“स्वस्थ नारी सशक्त परिवार” विशेष अभियान अंतर्गत दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या उपकेंद्र सैतवडे येथे महिला व बालकांसाठी विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सैतवडेचे सरपंच साजिद शेकासन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सत्कोंडी सरपंच सतीश थूल, गुंबद सरपंच उषा सावंत, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती कदम उपस्थित होत्या. डॉ. कदम यांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली व महिलांच्या आरोग्यविषयी मार्गदर्शन केले.
या शिबिरात महिलांना आरोग्य तपासणी व समुपदेशनासोबतच विविध सेवा पुरवण्यात आल्या. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, क्षयरोग, ॲनिमिया व सिकल सेल स्क्रीनिंग, गरोदर मातांची तपासणी व मार्गदर्शन, लसीकरण सेवा, मासिक पाळी स्वच्छता जनजागृती, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, योगा सत्र, पूरक आहार व आरोग्यदायी आहार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) कार्ड ई-केवायसीचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
शिबिरासाठी डॉ. भाग्यश्री कावरे, आरोग्य सहाय्यक श्री. तांबे, आरोग्य सहाय्यिका संकिता पारकर, समुदाय आरोग्य अधिकारी धनश्री पावरी, माधुरी सावंत, मयुरी रहाटे, सेविका पूनम वासावे, पूनम लाड, सोनाली डांगे, सेवक मोरे, बोके, वाहन चालक दादा दुदवाडकर, टेलिमेडिसिन अधिकारी लावण्या गोरे, सिद्धी प्रसादे, आशा गटप्रवर्तक गोताड मॅडम, अंगणवाडी पर्यवेक्षक केतकर मॅडम, मुख्याध्यापिका लांजेकर मॅडम, जाधव मॅडम, मुख्याध्यापक अंतुले सर, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमामुळे महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती वाढून त्यांना नियमित तपासणी व काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.

