(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावची सुकन्या, दुर्गवळीवाडी येथील रहिवासी श्रुती संजय दुर्गवळी हिची रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने महिला पोलीस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. विशेष म्हणजे मालगुंड आग्राडी व दुर्गवळीवाडी परिसरातील ती पहिली महिला पोलीस ठरली असून, तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रुतीच्या यशाचे औचित्य साधत ग्रामस्थांनी जल्लोषात तिचे स्वागत केले. गुलालाची उधळण, टाळ्यांचा कडकडाट आणि अभिनंदनाच्या वर्षावात तिचा गौरव करण्यात आला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी तिच्या कर्तृत्वाचा अभिमान व्यक्त केला.
श्रुती ही मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून, तिने भूगोल विषयात गोल्ड मेडल मिळवत प्रथम क्रमांक पटकावला होता. यानंतर पोलीस भरतीसाठी झालेल्या मैदानी आणि लेखी परीक्षांमध्येही तिने उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
अत्यंत कष्टप्रद परिस्थितीत आई-वडिलांनी दिलेल्या पाठबळामुळे श्रुतीला शिक्षण घेता आले. त्यांच्या त्यागाचे आणि मेहनतीचे चीज करत तिने हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी पुढे जात, तिने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात तीन वर्षे पदवी शिक्षण पूर्ण केले आणि भूगोल विषयात सुवर्णपदक मिळवून आपली शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली.
शालेय जीवनापासूनच ती अभ्यासात हुशार होती. उच्च माध्यमिक परीक्षेत बळीराम परकर विद्यालय तसेच मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजमध्ये कला शाखेत ती प्रथम आली होती. शिक्षणातील सातत्य राखत तिने महाविद्यालयीन जीवनातही उल्लेखनीय यश संपादन केले.
अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही श्रुतीने आपली छाप सोडली आहे. महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ स्तरावर ऍथलेटिक्समध्ये तिने अनेक पदके जिंकली आहेत. तिच्या सर्वांगीण उत्कृष्ट कामगिरीमुळे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात तिला सलग तीन वर्षे ‘गोल्डन गर्ल’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
तरुण वयातच उच्च ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या श्रुतीने आपल्या कर्तृत्वातून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिचे यश हे केवळ वैयक्तिक नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
श्रुतीची रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात महिला पोलीस म्हणून झालेली निवड ही मालगुंडच्या इतिहासातील अभिमानास्पद घटना ठरली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण गावाची मान उंचावली असून, ग्रामस्थ, स्थानिक मंडळे आणि विशेषतः आग्राडी व दुर्गवळीवाडी येथील नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

