भारतामध्ये डाळींचे अन्नपदार्थांना विशेष महत्त्व आहे. उडीद, मूग, चणे, तूर आणि मसूर या डाळींचा आहारात मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र याच मसूर डाळीबाबत काही समुदायांमध्ये एक वेगळी समज आहे, ती ‘नॉनव्हेज’ मानली जाते.
मसूर डाळ ‘नॉनव्हेज’ का मानली जाते?
काही धार्मिक आणि पारंपरिक मान्यतांनुसार मसूर डाळ तामसिक अन्नाच्या श्रेणीत मोडते. हिंदू धर्मात अन्नाचे तीन प्रकार सांगितले आहेत—सात्विक, राजसिक आणि तामसिक. तामसिक अन्नामुळे आळस, राग किंवा नकारात्मक भावना वाढतात, अशी धारणा आहे. त्यामुळे साधुसंत किंवा आध्यात्मिक जीवन जगणारे लोक मसूर डाळ टाळतात.
पौराणिक कथांशी संबंध
काही कथांमध्ये मसूर डाळीचा संबंध पौराणिक घटनांशी जोडला जातो. समुद्र मंथनाच्या कथेत स्वरभानू (राहू-केतू) याच्या रक्तातून मसूर उत्पन्न झाली, अशी एक समज आहे. तसेच कामधेनू गायीच्या रक्ताशीही तिचा संबंध जोडणाऱ्या कथा प्रचलित आहेत. या कथांमुळे काही लोक मसूर डाळ ‘अपवित्र’ किंवा मांसाहारासारखी मानतात.
एक मान्यता अशी सांगितली जाते की, भगवान विष्णूंनी दैत्य स्वरभानूचे शीर धडापासून वेगळे केले, ज्यातून पुढे ‘राहू’ आणि ‘केतू’ यांचा उगम झाला. या प्रसंगात सांडलेल्या रक्तातून लाल मसूर दाण्यांची उत्पत्ती झाली, अशी पौराणिक कथा काही ठिकाणी प्रचलित आहे. त्यामुळे मसूर डाळ तामसिक आणि अशुद्ध मानली गेली, अशी धारणा काही समुदायांमध्ये आढळते.
इतिहासाच्या दृष्टीने पाहिले तर मसूर डाळीचा उगम सुमारे इ.स.पू. 2000 च्या सुमारास Egypt (मिसर) येथे झाला असल्याचे मानले जाते. ‘मिसर’ या शब्दावरूनच ‘मसूर’ हे नाव पडल्याचीही एक समज आहे. नंतर ही डाळ भारतात आली आणि पुढे मुघलकालातही तिचा आहारात समावेश झाला. तरीही, काही पारंपरिक हिंदू समुदायांमध्ये मसूर डाळीला धार्मिक कारणांमुळे वर्ज्य मानले जाते. यामागे पौराणिक आख्यायिका, शुद्धतेच्या संकल्पना आणि पारंपरिक श्रद्धा कारणीभूत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मसूर डाळ ‘मांसाहारासारखी’ मानली जाते.
एकूणच, डाळ हा भारतीय आहाराचा अविभाज्य भाग असला तरी, लाल मसूरबाबतचे मतभेद हे श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेशी जोडलेले आहेत. आहाराची निवड ही अनेकदा वैयक्तिक तसेच सांस्कृतिक मूल्यांवर आधारित असते, आणि त्यातूनच विविधतेचे सौंदर्य दिसून येते.
आयुर्वेदाचा दृष्टिकोन
आयुर्वेदानुसार मसूर डाळ शरीरात उष्णता वाढवणारी आणि तामसिक गुणधर्म असलेली मानली जाते. त्यामुळे ध्यान, साधना करणाऱ्या व्यक्तींना ती टाळण्याचा सल्ला दिला जातो.
विज्ञान काय सांगते?
वैज्ञानिक दृष्टीने मसूर डाळ पूर्णपणे शाकाहारी आणि अत्यंत पौष्टिक आहे. यात प्रथिने, लोह आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. शाकाहारी लोकांसाठी ही प्रथिनांचा उत्तम स्रोत मानली जाते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठीही मसूर डाळ उपयुक्त ठरते.
मसूर डाळ ‘नॉनव्हेज’ मानली जाण्याची धारणा ही श्रद्धा, परंपरा आणि पौराणिक कथांवर आधारित आहे. वैज्ञानिकदृष्ट्या मात्र ती एक आरोग्यदायी शाकाहारी अन्नपदार्थ आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार निर्णय घेताना वैज्ञानिक माहितीही लक्षात घेणे आवश्यक आहे.

