( मुंबई )
१२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. या घोषणेनंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
विशेष म्हणजे, यावेळी विद्यमान आमदारांना संधी न देता नवीन चेहऱ्यांवर पक्षाने विश्वास दाखवला आहे. काँग्रेसमधून नुकत्याच भाजपमध्ये दाखल झालेल्या प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सातव या यापूर्वी विधान परिषदेच्या आमदार होत्या. पक्षांतरानंतर त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
दरम्यान, या निवडणुकीत अनेक इच्छुकांनी प्रयत्न केले होते. मात्र, अंतिम यादीत काही प्रमुख नेत्यांना संधी न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी असल्याची चर्चा आहे. केशव उपाध्ये आणि माधव भंडारी यांसारख्या नेत्यांना पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागली आहे.

महायुतीची आघाडी, दहाव्या जागेवर लक्ष
संख्याबळाच्या आधारे सत्ताधारी महायुतीला आठ जागा सहज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उर्वरित जागांवरून मात्र राजकीय रणनीती सुरू झाली आहे. शिवसेनेकडून दहावा उमेदवार रिंगणात उतरवण्याचे संकेत मिळत असून बच्चू कडू यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती, या बैठकीत उमेदवारांबाबत अंतिम निर्णय झाल्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत संभ्रम कायम
दुसरीकडे, महाविकास आघाडीत उमेदवारीबाबत अद्याप स्पष्टता नाही. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, असा आघाडीतील नेत्यांचा आग्रह आहे. मात्र, ठाकरे स्वतः निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे संकेत आहेत.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावे, अशी भूमिका मांडली आहे. ठाकरे सहमत झाल्यास काँग्रेस आपला दावा मागे घेण्याची शक्यता आहे. अन्यथा या जागेवर काँग्रेस दावा करणार असल्याचे संकेत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातही इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारीवर अंतिम निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची लढत पाहायला मिळणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

