(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील परचुरी पंचायत समिती गण या सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित राहिल्या असून, या गणातून मुस्लिम महिलांना संधी द्यावी, अशी मागणी जेष्ठ पत्रकार आणि संगमेश्वर खाडी भागाचे अभ्यासक इकलाक खान यांनी केली आहे. “जो पक्ष मुस्लिम महिलेला उमेदवारी देईल, त्याच्यापाठी ठाम उभे राहून निवडून आणू,” असे ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संगमेश्वर पंचायत समिती अंतर्गत फुणगुस खाडी विभाग हा मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यापासून येथे गटवंडण झाले आहे. परचुरी पंचायत समिती गण यावेळी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने, मुस्लिम समाजाला पंचायत समितीत संधी मिळवण्याची मागणी वाढली आहे.
माजी आमदार हुसनाबानू खलपे यांनीही मुस्लिम महिलांची सुक्षित आणि सक्षम नेतृत्व क्षमता दाखवून दिल्याचे उदाहरण दिले आहे. परचुरी पंचायत समिती गणात अनेक मुस्लिम मोहल्ले असल्यामुळे, या समाजातील तरुण महिलांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. यासाठी तयार असलेले संभाव्य उमेदवार फरजाना इकलाक खान, नदीमा जमीर नाईक, अफसाना महंमद खान, शकीला इकबाल पटेल असे उमेदवार आहेत.
इकलाक खान यांनी स्पष्ट केले की, “कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली तर आम्ही तयार आहोत. कोणत्याही परिस्थितीत ही संधी सोडणार नाही; लढणार म्हणजे लढणारच. असा विश्वास व्यक्त करत राजकीय पक्षांनी याबाबत वेळीच निर्णय घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

