(संगमेश्वर / प्रतिनिधी)
साखरपा–संगमेश्वर या ३२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे लाखो रुपयांचे डांबरीकरण केल्यानंतरही सध्या या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. तब्बल ३२ कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर सध्या खड्ड्यांची मालिकाच तयार झाली असून, वाहनचालकांची अक्षरशः कसरत होत आहे.
बुरंबी स्टॉपजवळ मोठ-मोठे खड्डे तयार झाले असून, वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे. जड वाहनांची वाढती वाहतूक आणि बांधकाम विभागाचे ढिसाळ नियोजन यामुळे रस्त्याचे तुकडे तुकडे होऊ लागले आहेत. गणपती उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना देखील बांधकाम विभागाने याकडे डोळेझाकच केली आहे. रस्त्यांची ही अवस्था यात्रेकरूंसाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, मुरादपूर तिठा परिसरात खाजगी कंपनीने विनापरवाना रस्ता व त्याच्या बाजूने खोदकाम सुरू ठेवले आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत. तसेच तत्काळ रस्त्याची डागडुजी करण्यात यावी. अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोहर गुरव यांनी दिला आहे.