(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यात एकाच रात्री चोरट्यांनी घातलेल्या धुमाकुळाने संपूर्ण जिल्हा हादरला असून या प्रकरणातील गुंतागुंत पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. देवरुख येथील कृष्ण रेसिडन्सीच्या पार्किंगमधून अमित वासुदेव साने यांची मारुती झेन गाडी चोरीला गेल्यानंतर अवघ्या काही तासांतच संगमेश्वर पोलीस हद्दीतील लोवले येथे ती बेवारस स्थितीत सापडली. मात्र या घटनेला खरे वळण मिळाले ते म्हणजे लोवलेपासून अवघ्या दोन-तीन किलोमीटरवर असलेल्या बुरंबी गावातून मारुती नागेश सुतार यांची इको गाडी त्याच रात्री लंपास झाल्याचे समोर आले तेव्हा.
या दोन्ही घटनांचा घटनाक्रम पाहता तालुक्यातील जनतेतून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.चर्चेतून असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, देवरुखहून झेन गाडी घेऊन पळालेल्या चोरट्यांनी लोवलेपर्यंत प्रवास केला असावा, पण तिथे गाडीचे इंधन संपल्यामुळे किंवा काही तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना ती गाडी रस्त्याच्या कडेला सोडून द्यावी लागली असावी. त्यानंतर पुढच्या प्रवासासाठी वाहन नसल्याने चोरट्यांनी पुन्हा दोन किलोमीटर मागे फिरून बुरंबी गाव गाठले असावे आणि तिथून इको गाडी चोरली असावी. जर हा तर्क खरा असेल, तर चोरटे लोवले ते बुरंबी हे अंतर पार करण्यासाठी कोणत्या मार्गाचा किंवा साधनानाचा वापर करून आले, हा मोठा प्रश्न आहे.
दुसरीकडे, हे कृत्य एखाद्या सराईत टोळीचे असावे अशीही दाट शक्यता वर्तवली जात आहे. देवरुखहून येत असतानाच या टोळीने बुरंबीतील इको गाडीवर पाळत ठेवली असावी. टोळीतील काही सदस्यांनी बुरंबीत उतरून इको गाडी ताब्यात घेतली असावी आणि उर्वरित साथीदारांनी झेन गाडी लोवले येथे सोडून देऊन सर्वजण एकाच गाडीने पसार झाले असावेत. एकाच रात्री दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या या चोऱ्यांमुळे तपासाचे चक्र क्लिष्ट झाले असून पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
देवरुख पोलिसांनी झेन गाडी हस्तगत केली असली तरी मूळ चोरटे आणि बुरंबीतून चोरीला गेलेली इको गाडी अद्याप बेपत्ता आहे. दोन गावांच्या भौगोलिक अंतराचा विचार करता हा सर्व प्रकार अत्यंत नियोजनबद्ध वाटत असून या चोरीचे गूढ उकलण्यासाठी पोलीस आता तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत आहेत. या धाडसी चोरीच्या सत्रामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण असून चोरट्यांचा हा खेळ कधी थांबणार,चोरांचा माघ काढण्यात पोलिसांना केव्हा यश येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

