(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
मृत्यूनंतरही समाजोपयोगी ठरण्याची उदात्त परंपरा जपत रत्नागिरीत आणखी एक प्रेरणादायी देहदान पार पडले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १९ वे मरणोत्तर देहदान संपन्न होत समाजात मानवतेचा जिवंत संदेश देण्यात आला.
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील कै. प्रदीप तुकाराम कोलते (वय ७९) यांचे सोमवारी (दि. २७ एप्रिल) अल्पशा आजाराने निधन झाले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधनासाठी देह उपयोगी पडावा, या उच्च विचारातून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयानुसार त्यांचे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे करण्यात आले. कै. कोलते यांनी साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालय तसेच बाबासाहेब कोलते ज्युनिअर कॉलेजमध्ये कमिटी सदस्य म्हणून कार्य करत शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे आणि नातेवाईक असा मोठा परिवार आहे.
देहदानाच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित राहून या निर्णयाला भावनिक साथ दिली. सीमा पाटणे, स्मिता लाड, ओंकार कोलते, शेखर कोलते, अविनाश कोलते, कमलेश कोलते, विनय कोलते, कैलास कोलते आणि राहुल भिंगार्डे यांची उपस्थिती होती. संपूर्ण प्रक्रिया महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव तसेच विभागातील कर्मचारी वर्गाने आवश्यक कार्यवाही केली. देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला मोलाची मदत होत असून, समाजात अशा प्रकारच्या दानाबाबत जागृती आणि प्रेरणा निर्माण होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

