( संगमेश्वर / प्रतिनिधी )
जवळपास एकशे पंचाण्णव वर्षांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील माखजन दशक्रोशीतील आंबव-आरवली गावाच्या वेशीवरून आदित्य नारायणाची मूर्ती त्या काळातील एका तेलगू ब्राह्मणाने आरवली ब्राह्मण वाडीतील ग्रामस्थांना आणून सुपूर्त केली आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात एक छोटे पेंढारू मंदिर बांधले. दशक्रोशीत माधुकरी मागून उपजीविका करणाऱ्या तेलंगी ब्राह्मणाच्या निधनाच्या पश्चात वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी सन अठराशे शहात्तर मध्ये या गवताचे छप्पर असणाऱ्या मंदिराचा पहिल्यांदा जिर्णोद्धार होऊन पक्क्या बांधकामाचे मंदिर उभारण्यात आले. त्या वेळेपासून हा जीर्णोद्धाराचा दिवस दरवर्षी वर्धापन दिन म्हणून उत्सव स्वरूपात साजरा करण्यात येतो. या वर्धापन दिनाला यंदा एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने दरवर्षी तीन दिवस होणारा हा उत्सव यावर्षी विशेष उत्सव म्हणून पाच दिवस ग्रामस्थांच्या सहविचाराने करण्यात आला.
पाच दिवसाच्या या उत्सव कालावधीत अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे १९ एप्रिल रविवार रोजी सकाळी सौर आवर्तने असे धार्मिक कार्यक्रम आणि सायंकाळी पाच वाजता श्री गुरुप्रसाद कानिटकर यांचे ‘छत्रपती शिवाजी स्वराज्य ते साम्राज्य’ अशा विषयावरचे प्रवचन तसेच रात्री स्थानिक महिला मंडळांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. चतुर्थीच्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक २० एप्रिल रोजी सकाळी सौर आवर्तनाची पूर्णाहुती आणि सायंकाळी धामणी संगमेश्वर येथील प्रसिद्ध प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांचे ‘ भगवान परशुराम ‘ या विषयावरचे प्रवचन संपन्न झाले.
मागील दीडशे वर्षातील अनेक आदित्य भक्तांच्या आठवणींना उजाळा देणारी ‘शतसुवर्णरमणी’ ही चौऱ्याहत्तर रंगीत पानांची स्मरणिका या निमित्ताने उपस्थित ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. रात्री सुप्रसिद्ध अभिनेते आणि निवेदक श्री विघ्नेश जोशी आणि सहकाऱ्यांचा सांगीतिक कार्यक्रम संपन्न झाला. युवा गायक ओंकार प्रभूघाटे आणि गायिका निधी घारे यांनी अतिशय उत्तम प्रकारे आपली गाणी सादर केली.त्यांना वाद्य साथसंगत अनुक्रमे हार्मोनियम हर्षल काटदरे, व्हायोलिन उदय गोखले, तबला प्रथमेश देवधर आणि पखवाज मिलिंद लिंगायत यांनी केली
पंचमीच्या दिवशी अर्थात मंगळवार २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी भव्य शोभा यात्रेने सालाबाद च्या उत्सवाला अत्यंत जोशपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. श्री देव आदित्य नारायण मंदिरापासून आरवली गावाचे ग्रामदैवत श्री केदारनाथाच्या मंदिरापर्यंत झालेल्या या शोभायात्रेत उत्सवासाठी उपस्थित तीनशेहून जास्त भक्त मंडळींचा अतिशय उत्साही जोश पूर्ण सहभाग होता. डीजे आणि स्पीकर मुक्त शोभायात्रा असे वैशिष्ट्य आणि वेगळेपण असणाऱ्या या शोभायात्रे मध्ये पारंपारिक अभंग, नामघोष, गजर, मर्यादित ढोल ताशे आणि झांज, टाळ,लेझीम असे संस्कृती परंपरा जपणारे पारंपारिक साहित्य उपयोगात आणलेले होते.
सायंकाळी महिलांचे हळदीकुंकू आणि रात्री नियोजित छबिना पालखी भजन आणि मध्यरात्री कीर्तन अशा कार्यक्रमाने पंचमीच्या दिवसाची सांगता झाली. षष्ठीच्या दिवशी अर्थात २२ एप्रिल २०२६ या दिवशी सकाळी सौर आवर्तने आणि गणपती अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने असे धार्मिक विधी संपन्न झाले तर संध्याकाळच्या सत्रात ग्रामस्थांचे सुश्राव्य संगीत भजन आणि रात्री आरती मंत्र पुष्प छबिना असे कार्यक्रम संपन्न होऊन माजलगाव बीड येथील युवा कीर्तनकार लक्ष्मीप्रसाद पटवारी यांच्या कीर्तनाने दिवसाची सांगता झाली. मध्यरात्री साडेअकरा ते दीड अशा कालावधीतही कीर्तन श्रवणासाठी दोन अडीचशे पेक्षा जास्त भक्तमंडळींची उपस्थिती हे या उत्सवाचे आणखीन एक वैशिष्ट्य!
सप्तमीचा दिवस अर्थातच उत्सवाचा शेवटचा दिवस भरगच्च कार्यक्रमाने संपन्न झाला. सकाळी सौर आवर्तने आणि धार्मिक विधींच्या पाठोपाठ आरती मंत्र पुष्प आणि श्रींसाठीचा महाप्रसाद असे झाल्यावर सायंकाळी सहा ते आठ आदित्यच्या लहानभक्त मंडळींचे विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. १५० वा वर्धापन दिन महोत्सव म्हणून श्रींच्या समोर महिला भक्त मंडळींकडून ५६ भोग अर्थात ५६ पक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला तसेच रात्री अतिशय आकर्षक पद्धतीने मांडणी करून दीपोत्सवही साजरा करण्यात आला. रात्रीच्या भोजनानंतरच्या सत्रामध्ये ज्यांचे वय सत्तर पेक्षा जास्त आहे अशा पंचेचाळीस ज्येष्ठ आदित्यभक्तांचा मंदिर व्यवस्थापनाच्या तर्फे यथोचित सन्मान करण्यात आला.
छबिना आणि पालखी सोहळा म्हणजे सर्व आदित्य भक्तांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि उत्साहाला उधाण आणणारा उत्सवातील प्रमुख आकर्षणाचा भाग. रात्री अकरा ते मध्यरात्री दीड अशा कालावधीत आरत्या, अभंग, गजर फेर भोवत्या,फुगड्या,गोफ अशा अनंत प्रकारांनी रंगलेल्या छबिना आणि पालखी सोहळ्यानंतर ‘स्मरण उत्सवाचे’ हा मागील दीडशे वर्षाच्या उत्सवाच्या आठवणी जागृत करणारा अतिशय हृद्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दृकश्राव्य माध्यमातून जुनी छायाचित्र आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए आय चा समर्पक उपयोग करून मंदिर व्यवस्थापना तर्फे हा कार्यक्रम अतिशय रंजकपणे सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेताना पडद्यावर दिसणाऱ्या हृद्य आठवणींनी प्रेक्षक भक्तांना गहिवरून येत होते.
उत्सवाची सांगता लक्ष्मीप्रसाद पटवारी यांच्या सुश्राव्य लळीताच्या कीर्तनाने झाली ” सोडूनी सर्वही धंदा हरीचे पदवंदा” असं म्हणत म्हणत सर्व भक्तांनी आदित्य नारायणाचा प्रसाद म्हणून समोर आलेले तीर्थ आपल्या डोळ्यांना लावले आणि प्राशनही केले तसेच नारायणाच्या पादुकांचा आपल्या कपाळाला स्पर्श करून पुढील वर्षासाठीचा आनंद उत्साह आणि ऊर्जा तनु मनात साठवून घेतली.सालाबाद प्रमाणे अष्टमीच्या दिवशी आदित्य नारायणाचरणी नाट्य सेवा संपन्न झाली. यावर्षी परस्पर सहाय्यक मंडळ वाघांबे प्रस्तुत राज्य नाट्य स्पर्धेत राज्यस्तरावरती बक्षिसांची लयलूट करणारे संगीत जय जय गौरीशंकर हे संगीत नाटक सादर करण्यात आले. उत्सव समाप्तीनंतर नाट्यप्रयोगासाठीही तीन-चारशे प्रेक्षक उपस्थित होते.
कोकणातील परंपरा संस्कृती संवर्धनाचे काम करणारे असे अनेक उत्सव आजूबाजूच्या छोट्या मोठ्या गावांमध्ये चालू असतात अशा उत्सवांपैकी श्री देव आदित्य नारायणाचा हा वर्धापन दिन उत्सव म्हणजे दीडशे वर्षांची वैभवशाली परंपरा! दीडशे वर्ष अखंडितपणे ही परंपरा चालू ठेवणाऱ्या सर्व आदित्य भक्तांना आणि त्यांना प्रेरणा देणाऱ्यां श्री देव आदित्य नारायणा चरणी शतशः नमन.

