(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सामाजिक, शैक्षणिक व समाजपरिवर्तनाच्या कार्याला दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘तेजस सेवा प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा “राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६” यंदा रत्नागिरीतील समर्पित कार्यकर्ते प्रकाश गंगाराम सावंत यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर घेतलेली ही दखल जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
संस्थेच्या निवड समितीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सखोल आढावा घेतल्यानंतर सावंत यांची निवड जाहीर केली. समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने राबविलेल्या उपक्रमांमुळे आणि सामाजिक जाणिवा जागृत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. हा पुरस्कार येत्या ८ जून रोजी माळेगाव (जि. नाशिक) येथे आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या निवडीबद्दल सावंत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याला मिळालेल्या या सन्मानामुळे जिल्ह्यातील सामाजिक चळवळींना नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

