(रत्नागिरी / रायगड)
रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील तरुणीच्या निघृण हत्याकांडाचा अवघ्या पाच दिवसांत उलगडा करत रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चपळाई आणि तांत्रिक कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. या धडक कारवाईत अनिस मोहम्मदखान मालदार (वय ३८) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
२१ एप्रिल २०२६ रोजी गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीतील लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये ही संतापजनक घटना घडली होती. आरोपीने २२ वर्षीय तरुणीवर कोयत्याने सपासप वार करत तिची निर्घण हत्या केली आणि घटनास्थळावरून पसार झाला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३(१), ६४ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.
संशयित आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तयार करून ठाणे शहरासह विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. लॉज, डॉरमेट्री आणि रेल्वे स्थानक परिसरात कसून तपास केल्यानंतर अखेर एका डॉरमेट्रीमध्ये लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले. या अटकेमुळे गुन्ह्याचा उलगडा होत तपासाला निर्णायक वळण मिळाले आहे.
दरम्यान, तपासादरम्यान आरोपीचा पूर्वीही गंभीर गुन्ह्यांशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. २०२१ मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीदारांच्या सहाय्याने पोलिसांनी काटेकोरपणे त्याचा माग काढला. या प्रकरणाचा पुढील तपास महाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे करत असून, या धडक कारवाईबद्दल पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

