(मुंबई)
मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच महापालिकेत सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये एकत्र राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तीन दिवस नगरसेवकांना हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे मुंबईच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार का, याबाबत चर्चा रंगली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेचे २९ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने बहुमताचा आकडा जवळपास गाठला असला, तरी शिंदे यांच्या पाठिंब्याशिवाय भाजपला महापौरपद मिळवणे शक्य नाही, अशी राजकीय स्थिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची भूमिका निर्णायक ठरत असून त्यांच्या समर्थनावरच मुंबईतील सत्तास्थापना अवलंबून आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जोपर्यंत महापालिकेत अधिकृतरीत्या सत्तेचा दावा केला जात नाही, तोपर्यंत पक्षातील नगरसेवक एकजूट ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर संभाव्य फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्षांकडून नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्न होऊ शकतात, अशी शक्यता लक्षात घेऊन ही खबरदारी घेतली असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई महापालिकेत ११४ चा आकडा निर्णायक
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ११४ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक आहे. भाजपने ८९ जागांवर विजय मिळवला असून शिंदे गटाच्या शिवसेनेने २९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या पाठिंब्याशिवाय भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. दुसरीकडे, ठाकरे गटाची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एकत्रित आकडा ७२ वर पोहोचतो, तर काँग्रेसने २४ जागा जिंकत हा आकडा ९६ केला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी गणिते अजूनही तंग असल्याचे चित्र आहे.
पळवापळवी होणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या खबरदारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, आता कोणत्याही प्रकारची पळवापळवी होण्याचे कारण नाही. सर्व निर्णय एकत्रितपणे आणि शांततेत घेतले जातील. त्यामुळे नगरसेवक फुटण्याची शक्यता नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेचे अंतिम चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असून, एकनाथ शिंदेंची पुढील भूमिका मुंबईच्या राजकारणाला कोणते वळण देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

