(रत्नागिरी / वार्ताहर)
राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर विराट मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील हजारो प्राथमिक शिक्षक-शिक्षिका सहभागी झाल्याने जिल्हा परिषद परिसर घोषणांनी दणाणून गेला.
माळनाका येथून जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात मंडणगड ते राजापूरपर्यंतच्या विविध तालुक्यांतील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विविध मागण्यांसाठी एकजूट दाखवत शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनाद्वारे शिक्षकांनी टीईटी परीक्षा रद्द करून सेवा संरक्षण द्यावे, बीएलओ (BLO) आणि इतर अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची मुक्तता करावी, शिक्षकांना केवळ अध्यापनाचे काम देण्यात यावे, रिक्त पदे तातडीने भरावीत, जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करावी, शिक्षण सेवकाचा कालावधी रद्द करावा, पदोन्नतीतील अन्यायकारक अटी रद्द कराव्यात तसेच संचमान्यतेचे चुकीचे धोरण मागे घ्यावे, अशा प्रमुख मागण्या शासनाकडे मांडल्या.
राज्यभर सुरू असलेल्या या आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा आणि धरणे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे आभार मानले.

