(उरण)
उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर पाटील यांच्या मालकीची ‘तळजाई’ नावाची मच्छीमारी बोट खांदेरी किल्ल्याजवळ समुद्रात पलटी होऊन, काही मच्छीमार कामगार बचावले असताना तीन मच्छीमार अद्यापही बेपत्ता आहेत. या घटनेची चौकशी सुरू असतानाच, शनिवारी मध्यरात्री उरणच्या मोरा समुद्रकिनारी आणखी एक बोट बुडाल्याची घटना घडली, ज्यात एका परप्रांतीय खलाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची तुळजाई नावाची मच्छीमार बोट शनिवारी मासेमारी साठी गेली होती. वादळी वारे आणि उसळणाऱ्या लाटांमुळे ही बोट खांदेरी किल्ल्याजवळ आली असता ही बोट लाटांच्या जोरदार माऱ्याने बुडाली. यावेळी बोटीवर एकूण ९ खलाशी होते, ज्यातील पाचजणांनी ९ तास पोहत किनारा गाठला. मात्र नरेश राम शेलार, धीरज कोळी आणि मुकेश यशवंत पाटील हे तिघे खलाशी बेपत्ता आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तीघांची शोध मोहीम सुरू केली, तटरक्षक दलाचीही मदत घेण्यात आली. ड्रोन कॅमेऱ्यांचा मदतीने संपुर्ण अलिबाग किनार पट्टीवर शोध मोहीम राबविण्यात आली. स्थानिक ग्रामपंचायतीकडून किनाऱ्यांवर पहाणी करण्यात आली. मात्र रविवारी संध्याकाळ पर्यंत तिघांचाही शोध लागला नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सांगीतले.
सध्या समुद्रात वादळी हवामान असून, मासेमारी व प्रवासी वाहतुकीवर बंदी लागू आहे. तरीही, ही बंदी धाब्यावर बसवत बऱ्याच मच्छीमारी बोटी बिनधास्तपणे समुद्रात उतरवल्या जातात, यामुळे अशा प्रकारच्या अपघात व जीवितहानीच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक मत्स्यव्यवसाय विभाग व बंदर अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
समुद्रात सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्यामुळे आणि संबंधित यंत्रणांकडून आवश्यक ती कारवाई होत नसल्याने मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, बंदीनंतरही मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक व मच्छीमार संघटनांकडून करण्यात येत आहे.