( रत्नागिरी /प्रतिनिधी )
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथील विशेष नवजात शिशु काळजी कक्षात (SNCU) दाखल करण्यात आलेल्या एका अत्यंत कमी वजनाच्या अर्भकाने डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी मृत्यूवर मात करत जीवन मिळवले आहे.
दिनांक १५ मार्च २०२५ रोजी पहाटे ५.३० वाजता लीना सुतार (वय ३३, रा. पाली, ता. गुहागर) यांनी या रुग्णालयात एका अवघ्या ७५० ग्रॅम वजनाच्या आणि फक्त २७ आठवड्यांच्या गर्भावधीत जन्मलेले बाळ जन्माला घातले. बाळाची प्रकृती अत्यंत नाजूक होती. लगेचच त्याला SNCU मध्ये दाखल करण्यात आले.
बाळाला श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने व्हेंटिलेटरच्या सहाय्याने कृत्रिम श्वास दिला गेला. RDS (Respiratory Distress Syndrome) श्वसन त्रास सिंड्रोम एक गंभीर फुफ्फुसांची समस्यामुळे श्वसन नलिकेद्वारे आवश्यक ते सारफॅक्टन्ट औषध दिले गेले. डोळ्यांच्या ROP (Retinopathy of Prematurity) ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’च्या तपासण्या मोफत खासगी रुग्णालयात करून घेण्यात आल्या. मेंदूच्या सोनोग्राफीमधून बाळाला हायड्रोसेफलस असल्याचे निदान झाले. यावर पहिल्यांदाच सरकारी रुग्णालयात Serial Lumber Tapping करून उपचार करण्यात आले. या लढाईत वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ज्ञ डॉ. शापान पावसकर, डॉ. आदित्य वडगावकर, अधिसेविका श्रीम. जयश्री शिरचनकर, परिचारिका श्रीम. श्रुती जाधव, कक्ष पर्यवेक्षिका श्रीम. सुवर्णा कदम आणि संपूर्ण नर्सिंग टीम यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
दिवसागणिक बाळाची प्रकृती सुधारत गेली आणि अखेर ६० दिवसांच्या उपचारांनंतर, दिनांक १४ मे २०२५ रोजी बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जवेळी बाळाचे वजन १६९० ग्रॅम झाले होते, जे आरोग्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल ठरले. नातेवाईकांना पुढील तपासण्यांसाठी नियोजित तारीख दिली असून, आशा स्वयंसेविका घरोघरी भेटी देऊन आवश्यक ते मार्गदर्शन करतील. तपासणीसाठी फाईल व पाठपुरावा कार्डही देण्यात आले आहे.
या अनोख्या वैद्यकीय यशामध्ये सहभागी सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे नातेवाईकांनी मनःपूर्वक आभार मानले असून, रत्नागिरीतील सरकारी रुग्णालयातील हा जीवदानाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

