(मुंबई / वृत्तसंस्था)
एचडीएफसी इन्शुरन्स हेल्प डेस्कमधून बोलत असल्याची बतावणी करून ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा गोवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज परिसरातील तीन कॉल सेंटरवर एकाचवेळी धाड टाकून 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 17 लाख 18 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, प्राथमिक तपासात या टोळीने 78 लाख रुपयांहून अधिक रकमेची ऑनलाइन फसवणूक केल्याचे धागेदोरे समोर आले आहेत.
गोवंडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, तक्रारदाराला एचडीएफसी इन्शुरन्स हेल्प डेस्कमधून बोलत असल्याचे सांगून विविध शुल्कांच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, पैसे भरल्यानंतरही कोणतीही सेवा किंवा लाभ न मिळाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर गडहिंग्लजमधील तीन वेगवेगळ्या कॉल सेंटरवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत 12 आरोपींना अटक करण्यात आली.
छाप्यादरम्यान आरोपींकडून 21 संगणक, 57 लॅपटॉप, 15 मोबाईल फोन, 3 राऊटर, 15 सिमकार्ड तसेच ऑनलाइन फसवणुकीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या या साहित्याची एकूण किंमत 17 लाख 18 हजार 200 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्राथमिक तपासात आरोपी बनावट इन्शुरन्स हेल्प डेस्कच्या नावाने ग्राहकांशी संपर्क साधत असल्याचे उघड झाले आहे. कर्ज, विमा किंवा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून विविध शुल्कांच्या नावाखाली पैसे उकळले जात होते. ग्राहकांकडून पैसे मिळाल्यानंतर आरोपी त्यांच्याशी संपर्क तोडत असल्याची कार्यपद्धती तपासात समोर आली आहे. या टोळीने राज्यातील आणि इतर भागांतील अनेक नागरिकांचीही फसवणूक केली असण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने केली. या कारवाईमुळे ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या रॅकेटमध्ये खळबळ उडाली असून, संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही इन्शुरन्स कंपनीच्या नावाने आलेल्या अनोळखी फोनवर त्वरित विश्वास ठेवू नये, बँक खाते, डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती, ओटीपी अथवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, तसेच कोणतेही शुल्क भरण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या अधिकृत हेल्पलाइनवर माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयास्पद ऑनलाइन व्यवहार झाल्यास तातडीने सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

