( देवळे / प्रकाश चाळके )
संगमेश्वर तालुक्यातील वरद बलवंत नलावडे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) २०२४ च्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात खुल्या गटातून ३४वा क्रमांक मिळवला आहे. या यशाच्या जोरावर त्याची कर सहाय्यक अधिकारीपदी निवड झाली आहे.
वरद नलावडे याचे दहावी व बारावीपर्यंतचे शिक्षण मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली येथे झाले असून पुढील पदवी शिक्षण इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली येथे पूर्ण केले. त्याचे वडील बलवंत नलावडे हे मीनाताई ठाकरे विद्यालयाचे प्राचार्य आहेत. प्रखर मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर वरदने हे यश मिळवले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

