(देवळे / प्रकाश चाळके)
मेघराजाची नुसती आभाळमाया दिसते, पण धरणीमातेची तहान मात्र अजूनही तशीच आहे. पाऊस येईल या आशेवर असलेला शेतकरी आज चिंतेत आहे. पावशाच्या कंठालाही जणू गुदमरल्यासारखी अवस्था झाली आहे.
पावसाचे सुरुवातीचे अंदाज उत्साहवर्धक होते. पाऊस केरळमध्ये दाखल झाला, मग गोव्यापर्यंत पोहोचल्याच्या बातम्या आल्या. वाऱ्यांचा जोर वाढत असल्याचेही सांगितले गेले. एक जूनपर्यंत पाऊस कोकणात पोहोचेल, असे भाकीत होते. मात्र दिवस पुढे सरकत गेले तसे पावसाचा प्रवासही लांबणीवर पडला आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले.
या वर्षी उन्हाळ्याने आधीच चांगलाच तडाखा दिला होता. जून महिना संपत आला तरी पावसाचा ठावठिकाणा नाही. त्यामुळे शेतकरी अधिकच चिंतेत आहे. कोकणात रोहिणी आणि मृग नक्षत्रात पारंपरिक पेरणी केली जाते. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला काही भागात झालेल्या हलक्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण पुढे आलेल्या तीव्र उष्णतेमुळे उगवलेली पिके करपू लागली आहेत.
काही शेतकरी आता पंपाच्या सहाय्याने सिंचन करून रोपे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही हवामानाचा अनिश्चितपणा कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे. काहीजण म्हणतात की ओला दुष्काळ परवडला, पण असा कोरडा काळ खूपच कठीण ठरत आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
निसर्गातील बदल अनेकदा प्राणी, पक्षी आणि वृक्षवल्लींनाही जाणवतात. पावसाची चाहूल देणारा पावशा पक्षी एप्रिल-मे महिन्यात “पेरते व्हा” अशी साद घालताना ऐकू येतो. मात्र यंदा जून उजाडला तरी त्याचा आवाजही हरवल्यासारखा वाटतो. जणू निसर्गातील हे संकेतही या अनिश्चित हवामानात हरवून गेले आहेत.
आजही आभाळात मेघांची गर्दी आहे, पण त्या मेघांमधून पाऊस कधी बरसणार याची उत्कंठा शेतकरी डोळे लावून बसला आहे. पावसाची ही प्रतिक्षा अधिकच जड होत चालली आहे.

